बापू जाधव
निमोणे : शिरूर तालुक्याच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या मातब्बर राजकारण्यांची जन्मभूमी असणाऱ्या शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटाचे आरक्षण इतर मागासवर्गीय महिला प्रवर्ग असल्याने सुरुवातीच्या चरणात यंदाची निवडणूक काही तगडी होणार नाही, अशाच पद्धतीचा सूर आळवला जात होता. मात्र, आठवड्यापासून अतिशय धक्कादायक नावे पुढे लागल्याने या जिल्हा परिषद गटात हाय व्होल्टेज ड्रामा रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.(Latest Pune News)
दिवंगत माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे, बहुजन नेते दौलतनाना शितोळे यांच्या पत्नी पूजा शितोळे यांनी थेट भाजपकडून दावेदारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीकडून शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे यांच्या पत्नी सुप्रिया दसगुडे यांचे नाव पुढे आलेे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उज्ज्वला विजय भोस यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
शिरूर ग्रामीण-न्हावरे या जिल्हा परिषद गटाची भौगोलिक रचना शहरी, निमशहरी आणि बागायत पट्टा अशा स्वरूपात विभागली आहे. शहरालगत असणाऱ्या उपनगरांमध्ये या गटातील मोठा मतदार राहतो. सरदवाडी, रामलिंग, अण्णापूर, तर्डोबाचीवाडी, कर्डिलवाडी, गोलेगाव आदी निमशहरी वर्गात मोडतात. शिरूर पंचक्रोशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागावर दिवंगत माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र, गत जिल्हा परिषद निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जगदाळे यांच्या बाजूला उभे राहत पाचर्णेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत धक्कादायकरीत्या राहुल पाचर्णे यांचा पराभव घडवून आणला होता.
मागील सहा-सात वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. जिल्हा परिषद गटाची राजकीय समीकरणे बदलली. एकसंध राष्ट्रवादीचे शकले उडून दोन गटांत विभागली गेली. आजच्या घडीला राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी म्हणून कविता राजेंद्र जगदाळे, तृप्ती सरोदे, जयश्री गणेश रोडे ह्या प्रबळ दावेदार आहेत, तर भाजपच्या गोटातून पंचायत समितीचे माजी सदस्य आबासाहेब सरोदे यांच्या सुनबाई पल्लवी उमेश सरोदे व शिरूर पंचायत समितीच्या माजी उपसभापती
मंगल संतोष लंगे ह्या दावेदार आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षाकडून शैलजा जालिंदर दुर्गे यांचे नाव आघाडीवर आहे. या मतदारसंघांमध्ये मराठा समाजाच्या खालोखाल धनगर, माळी व दलित मतदारांची लक्षणीय संख्या असल्याने बहुजन समाजातून पूजा दौलत शितोळे यांची उमेदवारी पुढे आल्याने निवडणुकीचे राजकीय संदर्भ बदलले आहेत.
या जिल्हा परिषद गटावर मागील अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या न्हावरे या गावातून जिल्हा परिषदेसाठी अद्याप नाव जरी पुढे आले नसले, तरी पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सागर निंबाळकर व राष्ट्रवादीकडून दीपक कोहकडे, सागर खंडागळे यांची नावे आघाडीवर आहेत. सर्व पर्याय खुले या विचारावर श्रद्धा ठेवून गणेश बेंद्रे यांनी घोंगडी बैठकांचा सपाटा लावला आहे.
शिरूर ग्रामीण पंचायत समिती गणासाठी भाजपकडून स्वाती विठ्ठल घावटे, मंगल लंघे, वर्षा काळे, जिजाबाई दुर्गे, तर राष्ट्रवारी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुवर्णा कर्डिले यांनी दावेदारी जाहीर केले आहे. या गणात येणारी शिरूर पंचक्रोशी, तर न्हावरे पंचायत समिती चिंचणी, गुणाट, शिंदोडी, आंबळे, करडे, न्हावरे आदी गावांतील स्थानिक राजकारणाचा आगामी निवडणुकीवर प्रचंड मोठा प्रभाव राहणार आहे. उमेदवारी कुणाचीही पुढे येऊ, शिरूर पंचक्रोशीतील नातेसंबंधांचा प्रभाव मतपेटीतून दिसून येतो, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे महायुती किंवा महाआघाडी होऊ अथवा न होऊ, उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींचाही कस लागणार आहे, हे मात्र नक्की!