टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत जेवणाचे ताट धुणाऱ्या विद्यार्थिनींचे फोटो काढून पोक्सो गुन्हा, रॅगिंग, नोकरी घालवणे अशा गंभीर आरोपांची भीती दाखवत एका अनोळखी व्यक्तीने शिक्षकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भष्टाचार निर्मूलन समितीचा अध्यक्ष अशी ओळख देणाऱ्या या व्यक्तीने आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी सांगितले.
ही घटना नुकतीच शिरूर येथे सुरू असलेल्या मूल्यवर्धन प्रशिक्षणादरम्यान घडली. दोन शिक्षकी शाळेत दुपारी सव्वाबारा वाजता एकच शिक्षक उपस्थित होते. या वेळी दोन विद्यार्थिनी दुपारच्या जेवणासाठी ताटे स्वच्छ करत होत्या. पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या संमतीने राबविण्यात येणाऱ्या श्रमप्रतिष्ठा व स्वावलंबन उपक्रमाचा हा एक नियमित भाग असल्याचे शाळेकडून सांगण्यात आले. किचनशेडमध्ये जेवणाची तयारी सुरू असताना महामार्गावरून जाणारा एक अनोळखी व्यक्ती वारीच्या दिंडीसाठी चहा-पाणी मिळेल का? असा बहाणा करून शाळेत शिरला. बोलण्यात गुंतवून त्याने विद्यार्थिनींचे फोटो काढले व शिक्षकाचा मोबाईल क्रमांक घेतला.
शाळेबाहेर पडताच त्याचा शिक्षकाला फोन आला व त्याने तुम्ही मुलांवर अत्याचार करता, पोक्सोखाली गुन्हा करतो, नोकरी घालवतो अशा धमक्या दिल्या. पुढील संभाषणात प्रकरण मिटवण्यासाठी आर्थिक अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या. संशयिताचा हेतू लक्षात येताच शिक्षकांनी नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला.
दोन दिवस संपर्क न झाल्याने त्याने पंचायत समितीकडे ई-मेलद्वारे तक्रार केली. पुन्हा दुसऱ्या नंबरवरून फोन करून प्रकरण वरपर्यंत गेले आहे, माझ्या माघारीवरच शांत होईल, असा दावा केला. मात्र शिक्षकांनी व्यवस्थापन समिती, पालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत कॉल रेकॉर्डिंगसह घटना स्पष्ट केली. यानंतर संबंधित व्यक्तीची भाषा बदलली.
शिक्षण विभागाने या प्रकरणाची तपासणी करून उपक्रम कायदेशीर असल्याचे स्पष्ट केले व शिक्षकांना पाठिंबा दिला. अशा ब्लॅकमेलरपासून सावध राहण्यासाठी अनधिकृत व्यक्तींना शाळेत प्रवेश देऊ नये, असा सल्ला प्रशासनाने दिला. शिरूरमधील ही घटना अशा नव्या फसवणूक पद्धतीविषयी शाळांना सावध करणारी ठरली आहे.