शिरूर : शिरूर तालुक्याच्या राजकारणात तब्बल 35 वर्षांपासून निर्णायक भूमिका निभावणारा एक बडा नेता भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. शिरूर तालुक्याच्या राजकारणाची गणितेच यामुळे पूर्णपणे बदलणार आहेत. शिरूर तालुक्याच्या राजकारणातील मध्यवर्ती भूमिका निभावणारा हा बडा नेता कोणत्याही पक्षात असला तरी तालुक्याचे राजकारण स्वतःभोवती फिरवत राहण्यात मागील 35 वर्षांपासून यशस्वी झाला आहे.
तालुक्याच्या प्रत्येक गावात स्वतःचा दबदबा असणारा हा नेता आहे. कृषी, सहकार या विषयावर प्रचंड प्रभुत्व असणारा हा नेता पक्षांतराबद्दल स्वतः काहीही बोलत नाही. मात्र, त्यांचे समर्थक सोशल मीडियावर ‘आता निर्णय झालाय! जय श्रीराम’ अशा पद्धतीचे स्टेट्स टाकू लागल्याने येत्या एक-दोन दिवसांत काही तरी मोठे घडणार आहे, याचे संकेत मिळू लागले आहेत.
आजच्या घडीला तालुक्याच्या विविध राजकीय पक्षांत जे कार्यकर्ते काम करतात, त्यातील बहुतांशी याच नेत्याच्या तालमीत तयार झालेले आहेत किंवा या नेत्याबरोबर त्यांनी काम केले आहे. मतभेदामुळे हे सर्व जण वेगवेगळ्या पक्षात गेले आणि आजच्या घडीला सत्ताधारी म्हणून तालुक्याच्या राजकारणावर छाप पाडण्याचा प्रयत्न करू लागले.
मात्र, या बड्या नेत्याने खरोखरच भाजपचा रस्ता धरला, तर तालुक्याची सत्ता-समीकरणे बदलणार, सत्तेच्या मुख्य प्रवाहात या नेत्याला निर्णायक भूमिका निभावण्याची संधी मिळाली तर आजच्या घडीला जे नेते, कार्यकर्ते सत्तेच्या मुख्य प्रवाहात आहेत, त्यांच्या राजकारणाला भविष्यात नक्कीच पायबंद बसेल, अशीही चर्चा जोर धरत आहे.