शिरूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्यांची गर्दी वाढताच पुणे-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शनिवारी शिरूरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. शिरूर परिसरातील रांजणगाव माथा या ठिकाणी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.(Latest Pune News)
शिरूर हे विदर्भड्ढमराठवाडा भागाकडे जाणारे प्रवेशद्वार मानले जाते. व्यापार, उद्योग आणि पर्यटन या तिन्ही क्षेत्रांमुळे या मार्गावरून दररोज हजारो वाहने धावत असतात. रांजणगाव औद्योगिक वसाहत, शिक्रापूर परिसरातील औद्योगिक पट्टा तसेच सुपा एमआयडीसीमुळे या मार्गावरील औद्योगिक वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
यातच दिवाळी सणानिमित्त दोन दिवसांपासून पुण्यातून गावाकडे निघालेल्या नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. शनिवारी सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास रांजणगाव माथा परिसरात नगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची रांग थेट कोंढापुरीपर्यंत पोहचली होती. अनेक वाहनचालकांनी संयम न राखता विरुद्ध मार्गिकेमध्ये वाहने घुसविल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. वाढत्या कोंडीमुळे वाहतूक पोलिस आणि स्थानिक कार्यकर्ते यांना रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी धावपळ करावी लागली.
वाहनांच्या वाढत्या संख्येसह काही चालकांचा बेफिकीरपणा ही या कोंडीची मुख्य कारणे असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास महामार्गावर प्रवाशांना रविवारी 19 ऑक्टोबरला आणखी मोठा त्रास सहन करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पोलिस उपअधीक्षक प्रशांत ढोले यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर अहिल्यानगर बाजूने जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीसह अन्य वाहतूक वाढलेली आहे. पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता विविध उपाययोजना केलेली आहे. कारेगाव (ता. शिरूर) येथे पुणे-अहिल्यानगर महामार्गालगत लावलेल्या फलकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. पोलिस बंदोबस्तामध्ये हे अनधिकृतपणे लावलेले फलक आणि तत्सम अतिक्रमण काढण्यात आले आहे.
वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी शिक्रापूर ग््राामस्थ, एमसीआयडीसीचे कार्यकारी अभियंता ओमप्रकाश निला, सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभाग पुणेचे कार्यकारी अभियंता राहुल कदम, राज्य परिवहन महामंडळाचे शिरूर आगारप्रमुख मनीषा गायकवाड, पीएमआरडीएचे शाखा अभियंता संकेत बडे, शाखा अभियंता गौतम पटेल, पीएमपीएमए वाघोली डेपोचे जयदीप तमायचे, सार्वजनिक बांधकाम विभाग शिरूरचे शाखा अभियंता रणजित दाइंगडे, प्रशासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली. त्यात वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भात उपायांवर चर्चा झाली, असे ढोले यांनी सांगितले.
आळेफाटा : पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाच्या बोटा (ता. संगमनेर) परिसरात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण कामामुळे शनिवारी (दि. 18) सकाळपासून सुमारे सहा तासांहून अधिक काळ आळेफाटा बोटा परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. यामुळे दीपावलीनिमित्त गावाकडे निघालेल्या प्रवाशांना व वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाच्या सिमेंट काँक्रिटीकरण कामास दीड महिन्यापूर्वी सुरुवात झाली. हे काम जिल्ह्याच्या सरहद्दीवरील बोटापर्यंत गेले आहे. या कामामुळे ठिकठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होत आहे. अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील जड वाहनांची वाहतूक आळेफाटा बाजूने वळविल्याने वाहतूक कोंडीत भरच पडली.
शनिवारी सकाळपासून वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली. यामुळे बोटा ते आळेफाटा या दहा किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक संथगतीने सुरू होती. यामुळे सणानिमित्त गावाकडे निघालेल्यांचे हाल झाले. दहा किलोमीटर अंतर कापण्यास वाहनांना काही तास लागले. महामार्ग कर्मचारी घारगाव पोलिस वाहतूक सुरळीत करीत होते. दुपारी बारानंतर वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली.