

पिंपरखेड : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. हल्ल्याच्या तयारीत असलेल्या बिबट्यांच्या तावडीतून वेगवेगळ्या घटनांत दोन महिला, शालेय विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत आपला जीव वाचवला. या घटनांनी पिंपरखेड परिसर हादरला आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात आणखी बळी जाण्यापूर्वी वन विभागाकडून जास्तीत जास्त पिंजरे लावून तत्काळ बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.(Latest Pune News)
आठ दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांच्या शिवन्या बोंबे हिचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या वन विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. दोन बिबटे जेरबंद करण्यात आले असले, तरी बिबट्यांचे हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
पिंपरखेड परिसरातील आंबेवाडी परिसरात शुक्रवारी (दि.17) विश्वास वरे यांचे घराजवळ सुमारे दोन तास बिबट्याने हैदोस घातला. विद्यार्थिनी कल्याणी गाढवे ही सायंकाळी चारच्या सुमारास रस्त्याने जात असताना अचानक रस्त्यावर बिबट्या आला. तिने प्रसंगावधान राखत घराकडे धाव घेत आपला जीव वाचवला. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वडनेर रस्त्यालगत प्रेरणा नरेंद्र बोंबे या शेतात चारा काढत असताना हल्ल्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याला रस्त्याने जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी पाहून आरडाओरडा केला. इतर ग्रामस्थांनी धाव घेतल्यानंतर बिबट्याने त्या ठिकाणाहून पळ काढला. शालेय विद्यार्थ्यांच्या आरडाओरड्यामुळे प्रेरणा बोंबे या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या.
याच वेळी शेतकरी चंद्रकांत गुंजाळ यांच्या ओट्यावर येऊन बिबट्याने दहशत निर्माण केली. बेस कॅम्पच्या रक्षकांनी बिबट्याला हुसकावले. परंतु, बिबट्या फिरून पुन्हा फुलकोबीच्या शेतात आला. अन्य एका घटनेत सुलोचना वसंत बोंबे या सायंकाळी घरी जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने जोराची डरकाळी फोडून हल्ल्याचा प्रयत्न केला. भेदरलेल्या सुलोचना यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या दूर गेला. परंतु, तो डरकाळी फोडतच होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने पिंजरा लावला. पारगाव परिसरात बिबट्याचा मोठा उपद्रव असल्याने वन विभागाकडून शनिवारी सकाळीच पिंजरा लावण्यात आला. दाभाडे मळा रस्त्यावर बंद असलेल्या वीटभट्टीजवळ दररोज बिबट्या ठाण मांडून असतो. गावठाण ते राम बाबा समाधी स्थळ परिसरात बिबट्याचा वावर असल्याने विद्यार्थी व नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
रास्ता रोको आंदोलनावेळी उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी पिंपरखेड परिसरात येत्या दोन दिवसांत शंभर पिंजरे लावण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, पिंपरखेडमध्ये प्रत्यक्षात दहा आणि लगतच्या गावात सातच पिंजरे लावण्यात आले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी तीव नाराजी व्यक्त केली.