बापू जाधव
निमोणे : भविष्यात शिरूर तालुक्याच्या राजकारणाची धुरा नव्या दमाच्या नेतृत्वाच्या हाती येणार आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत तालुक्याची राजकीय, सामाजिक समीकरणे यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे पाहायला मिळतआहे. अशावेळी नव्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
शिरूर तालुक्याच्या राजकीय पटलावर मागील 50-60 वर्षांपासून मजबूत पकड ठेवणारी पिढी हळूहळू काळाच्या पडद्याआड गेली. एकेकाळी तालुक्याच्या राजकारणावर छाप असणारे दिवंगत माजी मंत्री बापूसाहेब थिटे, बाबूराव पाचारणे, हयात असलेले जुन्या पिढीतील राजकारणी सूर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे यांचे राजकारण तालुक्याच्या जनतेने जवळून अनुभवले. तत्कालीन समाजाला ते राजकारण बहुतांश प्रमाणात भावलेही आणि त्यामुळेच तालुक्याच्या राजकारणावर या मंडळींनी प्रदीर्घकाळ बस्तान बसविले. आजच्या घडीला या राजकारणाच्या मुशीत तयार झालेले माजी आमदार अशोक पवार सोडता इतर नेतृत्व वयाने आणि अनुभवाने तसे नवखे आहे.
शिरूर तालुक्याच्या सामाजिक इतिहासात मराठा समाजाच्या खालोखाल धनगर, माळी या समाजांची लोकसंख्या मोठी आहे. एकेकाळी धनगर समाजाच्या भरभक्कम पाठिंब्यावर तालुक्याच्या राजकारणात पोपटराव गावडे यांनी निर्विवाद वर्चस्व राखले, तर माळी समाजाच्या पाठबळावर किसन भाऊ भुजबळ यांनी तालुक्याचे राजकारण स्वतःभोवती सतत फिरत ठेवले. माजी मंत्री बापूसाहेब थिटे यांच्या मुशीत तयार झालेले पोपटराव गावडे, बाबूराव पाचारणे यांनी प्रदीर्घकाळ तालुक्याच्या राजकारणात मध्यवर्ती भूमिका निभावली, सहकारमहर्षी रावसाहेब दादा पवार यांचा वारसा पुढे चालवताना माजी आमदार अशोक पवार यांना सुरुवातीच्या काळात प्रस्थापित राजकारण्यांशी दोन हात करावे लागले, कालांतराने शिरूर-हवेलीच्या राजकारणावर अशोक पवार यांनी एकहाती वर्चस्व निर्माण केले. मात्र, राज्याच्या राजकारणातील बदलते संदर्भ, त्यांच्या पक्षात झालेली फाटाफूट आणि आर्थिक अडचणीमुळे बंद पडलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना, यासारख्या असंख्य अडचणींमुळे मागील विधानसभेत अशोक पवार यांचा पराभव झाला.
मागील पंधरा वर्षांपासून शिरूर-हवेलीच्या राजकारणावर अशोक पवार यांची एकहाती सत्ता होती, याच काळात राजकीय विरोधकांना त्यांनी सत्तेच्या मुख्य वर्तुळातून बाजूला फेकले होते. विधानसभेचा निकाल काहीही लागो. मात्र, तालुक्याची धुरा ही कायम पवार यांच्या हातीच राहिली. मात्र, अजितदादांनी वेगळा सुभा मांडल्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राजकारणात दुखावलेल्या असंख्य लोकांनी ’दगडापेक्षा वीट मऊ’ या न्यायाने विद्यमान आमदार माऊली कटके यांची तळी उचलून धरली. आजच्या घडीला वरवर पाहता शिरूर तालुक्याच्या राजकीय पटावरून माजी आमदार अशोक पवार यांच्या गटाची मोठ्या प्रमाणात पीछेहाट झालेली पाहायला मिळते.
भविष्यामध्ये तालुक्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेण्याची अनेकांची मनीषा आहे. राहुल पाचारणे, स्वप्निल ढमढेरे, स्वप्निल गायकवाड, शशिकांत दसगुडे, राजेंद्र जासूद, रवी काळे, दादा पाटील फराटे, मंगलदास बांदल, राजेंद्र गावडे, आबासाहेब मांढरे, दामू अण्णा घोडे आदींच्या राजकारणाची वाटचाल उद्याच्या काळात तालुक्याच्या नेतृत्वाची धुरा हाती घेण्याची आहे. मात्र, काळाच्या ओघात तालुक्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी, शैक्षणिक प्रश्न वेगवेगळ्या रूपाने उभे आहेत.
शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले आहे. मात्र, तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. पाण्याचे प्रश्न बिकट आहेत. काळाच्या ओघात भावनिक साद घालून निवडणूक जिंकण्याचे दिवस इतिहासजमा झाले आहेत. आजच्या घडीला जुन्या काळातील पोपटराव गावडे हे राजकारणात दिसत असले, तरी निवडणुकीच्या राजकारणात ते स्वतः उमेदवारी करतील हे कोणी धाडसाने सांगू शकत नाही. माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार, ’घोडगंगा’चे चेअरमन ऋषिराज पवार यांची दावेदारी मात्र भविष्यातही प्रबळ राहील. अशोक पवारांशी थेट लढत करण्याची मनीषा बाळगणार्या या नव्या दमाच्या नेतृत्वाने तालुक्याचा इतिहास, भूगोल आणि सामाजिक परिस्थितीचे वेळोवेळी अवलोकन केले, तरच त्यांचा भविष्यातील राजकीय प्रवास सुकर होईल