Bribery Case  Pudhari
पुणे

Shirur Police Bribery Case: शिरूर पोलीस ठाण्यात एकाच दिवशी दोन लाचप्रकरणे; ११ हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात, दुसरा पसार

शिवाजी बनकर रंगेहाथ पकडला; सतीश मुंढे ९५ हजारांची लाच घेऊन फरार, वरिष्ठांच्या सहभागाच्या चर्चेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

टाकळी हाजी: शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि. ३०) एकाच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या दोन धडक कारवायांमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. यातील पहिल्या कारवाईत हवालदार शिवाजी बनकर याला ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले, तर दुसऱ्या कारवाईत हवालदार सतीश मुंढे हा ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर एसीबीची चाहूल लागताच लाचेच्या रकमेसह पसार झाला. विशेष म्हणजे, हे दोन्ही पोलीस कर्मचारी टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्रात कार्यरत आहेत.

टाकळी हाजी येथील एकाच कुटुंबाशी निगडित जमिनीच्या वादावरून दोन वेगवेगळ्या तक्रारी काही दिवसांच्या अंतराने शिरूर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या अनुषंगाने एका घटनेचा तपास पोलीस हवालदार शिवाजी बनकर व दुसऱ्या घटनेचा तपास सतीश मुंढे यांच्याकडे होता. ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल होती त्यांच्याकडे दोन्हीही तपास अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.

११ हजारांची लाच घेताना बनकर रंगेहाथ

शिरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिवाजी ज्योतीराम बनकर याच्याकडे होता. या गुन्ह्यात आरोपींना अटक न करता कायदेशीर नोटीस देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी बनकरने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यापूर्वी तक्रारदाराकडून ५ हजार रुपये स्वीकारण्यात आले होते. २९ सप्टेंबर रोजी एसीबीने लाच मागणीची पडताळणी केली. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ च्या सुमारास जुन्या शिरूर पोलीस ठाण्याबाहेर उर्वरित ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बनकरला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.

९५ हजारांची लाच घेऊन मुंढे पसार

दुसऱ्या घटनेत, एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी व अटक टाळण्यासाठी हवालदार सतीश नाथाराव मुंढे याने सुरुवातीला १ लाख रुपयांची लाच मागितली होती. एसीबीच्या पडताळणीत तडजोडीअंती ९५ हजार रुपये ठरले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला होता. ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर कारवाईची चाहूल लागताच मुंढे अंधाराचा फायदा घेऊन लाचेच्या रकमेसह पसार झाला. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वरिष्ठांच्या सहभागाची जोरदार चर्चा

एकाच पोलीस दूरक्षेत्रातील दोन हवालदारांवर एकाच दिवशी कारवाई झाल्याने शिरूर तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. लाचखोर हवालदार सतीश मुंढे याने या प्रकरणात वरिष्ठांचेही नाव घेतल्याची जोरदार चर्चा रंगली असून, या लाचप्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास एसीबी करत आहे.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सतीश मुंढे प्रकरणात पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे यांनी, तर शिवाजी बनकर प्रकरणात पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले. प्रकरणाचा पुढील तपास एसीबी करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT