

गणेश खळदकर
पुणे: केवळ की-बोर्डवर बोट ठेवून परीक्षा देत असल्याचा दिखावा, शिक्षकच पेपर सोडवतानाचे चित्र, कॅमेऱ्याचा अँगल बदलून गैरप्रकाराला वाव, परीक्षेच्या पूर्वीच सीसीटीव्ही उपलब्ध नसलेल्या जागी परीक्षा कक्षाबाहेर विद्यार्थ्यांची हजेरी, अशा एक ना अनेक क्लृप्त्या लढवत शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेत राज्यातील ११ परीक्षा केंद्रांवरील तब्बल ९० संस्थांनी गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे संबंधित संस्थांमधील तब्बल ८ हजार विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. राज्य परीक्षा परिषदेमार्फत जुलै २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. परंतु, परीक्षेदरम्यान राज्यातील ११ परीक्षा केंद्रांवरील तब्बल ९० संस्थांनी विविध गैरप्रकार केल्याचे राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणले आहे.
परीक्षा कक्षात जाणीवपूर्वक अंधार
परीक्षा केंद्राच्या आयटी टीचर यांनी कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये बदल केला; जेणेकरून बोगस उमेदवार बसवून पास करता येऊ शकतील. गंगाखेड येथील केंद्रावर परीक्षा परिषदेला रेकॉर्डिंग व्यवस्थित पाहता येऊ नये, यासाठी एका कॅमेऱ्याला गम लावण्यात आला, तर काही ठिकाणी परीक्षा कक्षात जाणीवपूर्वक अंधार करण्यात आला. विद्यार्थी केंद्रामधून निघून गेल्यानंतरही ऑनलाइन लॉगिनमध्ये मात्र अनेक उमेदवार पेपर सोडवीत असल्याचे आढळून आले. काही ठिकाणी उमेदवार परीक्षेसाठी येण्यापूर्वीच ऑनलाइन लॉगिनमध्ये पेपर सोडवीत असल्याचा गंभीर प्रकार दिसून आला. काही केद्रांवर प्रत्यक्षात उमेदवार परीक्षा केंद्रामध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये कमी दिसले.
परंतु, ऑनलाइन डॅशबोर्डमध्ये जास्त उमेदवार परीक्षा सोडवत असल्याचे आढळून आले. परीक्षा सुरू असताना उमेदवार स्वत:चे आसन आणि संगणक आदलाबदल करीत असल्याचे दिसून आले. परीक्षा केंद्रामध्ये मोबाईलच्या मदतीने आयटी टीचर उमेदवार ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवत असल्याचे दिसून आले. काही उमेदवारांनी आयडी पासवर्ड न टाकताच परीक्षेला सुरुवात केली, असे अनेक गैरप्रकार संबंधित संस्थामध्ये घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
परीक्षेत ११ परीक्षा केंद्रांवरील ९० संस्थांमध्ये विविध अनियमितता झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे टंकलेखन परीक्षेतील पारदर्शकता कायम ठेवून सर्वच संस्थाचालकांचा विश्वास टिकवण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. आता या परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे.
डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद