MD drugs pudhari photo
पुणे

Shirur MD Drugs: शिरूरला ‘एमडी’ ड्रग्सचा विळखा; साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांना सूक्ष्म नियोजनाची गरज

दोन दिवसांत दोन मोठ्या कारवाया; स्थानिक पातळीवर ड्रग्स निर्मितीची चर्चा, स्लीपर सेलवर लक्ष देण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

निमोणे: शिरूर तालुक्याला पडलेला एमडी ड्रग्सचा विळखा फोडण्यासाठी पोलिसांनी सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे. शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन दिवसांच्या अंतरात दोन ठिकाणी 'एमडी' ड्रग्सचा मोठा साठा पकडून व काही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले, यापूर्वीही करोडो रुपयांचे 'एमडी' ड्रग्स व ती साखळी चालवणारे स्लीपर सेल जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, ही साखळी उद्ध्वस्त होण्यास तयार नाही. पुन्हा पुन्हा लाखो रुपयांचे ड्रग्स सापडत असेल तर हे विष खूप खोलवर मुरले आहे व हे उद्ध्वस्त करायचे असेल, तर पोलीस यंत्रणेबरोबरच समाजालाही पुढे येण्याची वेळ आली आहे.

प्रत्येक पोलीस कारवाईत या ड्रग्सचा मास्टरमाईंड हा परप्रांतीय असल्याचे सांगितात जाते. मात्र, समाजमनाचा कानोसा घेतल्यानंतर जनावरांचे गोठे, बंद पडलेले कारखाने, अडगळीतली गोदामे आदी ठिकाणी या ड्रग्सला पोषक असणारे रसायने लपवून ठेवली जातात, ही ठिकाणे स्थानिकांच्या मदतीशिवाय या परप्रांतीयांनी कशी मिळू शकतील.

या ड्रग्सची निर्मिती आता परराज्यातून होत नसून ती शिरूर तालुक्यात पुणे जिल्ह्यातच होत असल्याची जोरदार चर्चा आहे, या ड्रग्सच्या बाजाराचा सौदागर जरी परप्रांतीय असले तरी ही संपूर्ण साखळी चालवणारे निश्चित रूपाने स्थानिक आहेत, आज पर्यंत शेकडो जणांना अटक झाली, जवळजवळ १०० कोटी रुपयांच्या वर 'एमडी' ड्रग्स पोलिसांनी जप्त केले तरीही ही साखळी तुटत नसेल तर काहीतरी पोलिसांच्या नजरेतून सुटत आहे असेच म्हणावे लागेल.

ड्रसची निर्मिती ही अगदी गाव खेड्यात होत असल्याची ही चर्चा आहे, मागील दोन दिवसांपूर्वी शिरूर पोलिसांनी केलेली कारवाई पाहिली असता यामध्ये पकडलेले आरोपी दोन परप्रांतीय आहेत, तर शिरूर शहरात पकडलेले आरोपी हे स्थानिक गाव खेड्यातील आहेत , व्यसनाच्या पूर्ण अधिन गेलेला स्लीपर सेल पोलिसांच्या हाती लागल्यानंतर आम्हाला हे ड्रग्स परप्रांतीय डीलरने दिले याच धाटणीचे उत्तरे देत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे आणि याच मुद्द्यावरती तपास यंत्रणा भ्रमित होत आहे. एमडी ड्रग्ससाठी लागणारा कच्चा माल हा स्थानिक पातळीवर उपलब्ध होत नाही ना? हे पाहण्याची आता वेळ आली आहे.

आजपर्यंतच्या कारवाईत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्स पकडले गेले ती सर्व ठिकाणे अडगळीतील होती. व्यसनाच्या अधीन झालेला, गुन्हेगारीकडे झुकलेला वर्ग 'एमडी' ड्रग्सचा स्लीपर सेल म्हणून काम पाहत असल्याचे वेगवेगळ्या पोलीस कारवाईत पुढे आले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांबरोबरच स्थानिक पातळीवर व्यसनाच्या आहारी गेलेल्या वर्गाकडे लक्ष दिले. तर ही साखळी उद्ध्वस्त करण्यात यश येऊ शकते अशा पद्धतीची चर्चा ऐकायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT