शिरूर: शिरूर पोलिस व पुणे ग््राामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणलेले सुमारे 20 कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज प्रकरण आता केवळ अमलीपदार्थ तस्करीपुरते मर्यादित न राहता थेट पोलिस यंत्रणेतील काळ्या कारभारावर प्रकाश टाकणारे ठरत आहे.
आतापर्यंत सुमारे 10 किलो वजनाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, या प्रकरणात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी श्यामसुंदर रामदास गुजर (वय 39, रा. नेप्ती, ता. अहिल्यानगर) याला अटक करण्यात आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.
वास्तविक शिरूर शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा शिरकाव होत असताना स्थानिक शिरूर पोलिसांना याची माहिती कशी नव्हती, असा सवाल उपस्थित होत आहे. मतदानाच्या दिवशी पासशिवाय कोणालाही आत न सोडणारी यंत्रणा शहरात खुलेआम सुरू असलेल्या नशेच्या व्यापाराकडे दुर्लक्ष कसे करू शकते, याबाबत नागरिकांमध्ये तीव नाराजी आहे.
अनेक महिन्यांपासून शिरूर रस्त्यावरील टपऱ्यांवर नशेची पाने विकली जात असल्याच्या तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने तरुण व शाळकरी मुले व्यसनाधीन होत असल्याचा आरोप होत आहे.
शिरूर शहरातील वाढती उपनगरे व वस्ती लक्षात घेता अशा बेकायदेशीर धंद्यांवर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. मात्र, दुर्लक्षामुळे तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत अडकण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिस यंत्रणेतील सहभाग व आर्थिक हितसंबंधांचा संशय लक्षात घेता याप्रकरणाची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.