MD Drugs Pudhari
पुणे

Shirur MD Drugs Racket: शिरूरमध्ये एमडी ड्रग्स कारखान्याचा कट उघड; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

ड्रग्स विक्रीपलीकडे थेट निर्मितीचा डाव; पुणे-नगर पट्ट्यातील गुप्त रॅकेटमुळे नागरिकांमध्ये चिंता

पुढारी वृत्तसेवा

निमोणे: मागील काही दिवसांपूर्वी शिरूर तालुक्यामध्ये पोलिसांनी एमडी ड्रग्स प्रकरणात काही गुन्हेगारांना गजाआड केले. या गुन्हेगारांची कसून चौकशी करीत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे गुन्हेगार केवळ एमडी ड्रग्सची विक्रीच करीत नव्हते, तर चक्क या परिसरात ड्रग्सनिर्मितीचा कारखाना काढण्याचे नियोजन करीत होते. पोलिसांच्या कारवाईमुळे हा मोठा अनर्थ टळला असला, तरी यानिमित्ताने नशेच्या बाजारातील सौदागरांचे भयानक मनसुबे उघड झाले आहेत.

मागील दोन-अडीच वर्षांपासून एमडी ड्रग्स प्रकरणात अनेकांना अटक झाली. कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला; तरीही ही शृंखला अविरतपणे सुरूच आहे. नशेचा हा नवा प्रकार तरुणाईत खूप खोलपर्यंत रुजला आहे. सुरुवातीच्या काळात या सौदागरांनी बाहेरून ड्रग्स आणून आपले हातपाय पसरविले. मात्र, आता त्यांना याच परिसरात थेट कारखानदारी उभी करायची आहे. बाहेरील गुन्हेगार स्थानिक पातळीवरील भक्कम पाठिंब्याशिवाय आणि मदतीशिवाय इतके मोठे धाडस करूच शकत नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. पुणे-नगर रस्त्याच्या आसपासच्या परिसरात या रॅकेटने चांगलेच बाळसे धरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आजवर पोलिस कारवाईत जे गुन्हेगार सापडले, त्यातील बहुतांश जणांची पोलिसदफ्तरी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. समाजात पत असणाऱ्या आणि चांगल्या कुटुंबातील मुलांना गळाला लावून हे रॅकेट उभे केले जात असल्याचे समोर येत आहे.

अदृश्य शक्ती पोलिसांच्या रडारबाहेर?

एमडी ड्रग्सचे वितरण करणारी कोणतीतरी अत्यंत ‌‘पॉवरफुल‌’ शक्ती पडद्यामागून सूत्रे हलवत आहे, जी अद्याप पोलिसांच्या रडारवर आलेली नाही. या वितरणव्यवस्थेतील गुन्हेगारांना एमडी ड्रग्स कशा पद्धतीने तयार करायचे, याचे पूर्ण तांत्रिक ज्ञान आहे आणि म्हणूनच ते या परिसरात कारखाना काढण्याचे स्वप्न पाहत आहेत. अनेकदा तपासात परराज्यांतील टोळ्यांचा सहभाग समोर येतो; मात्र स्थानिक पातळीवर आश्रय मिळाल्याशिवाय बाहेरचे गुन्हेगार येथे आपला जम बसवूच शकत नाहीत, हे वास्तव आहे.

‌‘सप्लायर‌’ कधी कागदावर येणार?

एमडी ड्रग्स नावाच्या या विषाने परिसरातील कुटुंबव्यवस्था खिळखिळी करून टाकली आहे. अनेक तरुण या व्यसनाच्या आहारी जाऊन मानसिकदृष्ट्‌‍या विकलांग झाले आहेत. पानटपऱ्या, मोटारसायकलवरून किंवा रस्त्याच्या कडेला उभे राहून छुप्या पद्धतीने या ड्रग्सची विक्री होत असल्याचे पोलिस कारवायांवरून स्पष्ट झाले आहे. दरवेळी केवळ किरकोळ विक्रेता (पेडलर) पोलिसांच्या हाती लागतो; मात्र मुख्य पुरवठादार (सप्लायर) अद्याप कधीच कागदावर आलेला नाही.

शोध घेणे काळाची गरज

पोलिस तपासात उघड झालेल्या कारखानदारीच्या नियोजनामुळे आता सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांवर मात करीत स्वतःला सुरक्षित ठेवणारा हा मुख्य सूत्रधार नक्की कोण? या गुन्हेगारांना इतके मोठे धाडस करण्याचे बळ कोणाकडून मिळते? आणि या परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा ‌‘झारीतील शुक्राचार्य‌’ कोण आहे? याचा मुळासकट शोध घेणे आता काळाची गरज बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT