Guns Pudhari
पुणे

Shirur Firing Case: शिरूरच्या करडेत मध्यरात्री गोळीबाराचा थरार; तरुणावर हल्ला, आठ जणांवर गुन्हा

मारहाणीनंतर पिस्तुलातून अंदाधुंद फायरिंग; हल्लेखोरांचा शोध सुरू, परिसरात दहशतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

निमोणे: शिरूर तालुक्यातील करडे गावात शनिवारी (दि. १८) मध्यरात्री एक ते दीड वाजेदरम्यान एका युवकार सराइतांनी अंदाधुंद गोळीबार करीत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी निखिल सतीश थेऊरकर (वय २३, रा. करडे, ता. शिरूर) याने शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आदित्य लंघे (रा. करडे, ता. शिरूर), बबलू सोनलकर (रा. सिंहगड रोड, ता. हवेली), टिन्या शेळके (रा. रांजणगाव गणपती), दाद्या ऊर्फ रोहन पंचमुख (रा. करडे, ता. शिरूर) यांच्यासह आठ जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करडे गावातील मारुती मंदिराच्या पाठीमागे भैरवनाथ मंदिराजवळ, स्मशानभूमीच्या तळ्याजवळ निखिल थेऊरकर या युवकाला आठ जणांच्या टोळीने गाठले. त्याला बेदम मारहाण करीत पिस्तूलमधून अंदाधुंद फायरिंग सुरू केली. यातून वाचण्यासाठी सतीशने शेजारील तळ्यामध्ये उडी मारली. दरम्यान, गोळीबाराच्या आवाजाने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लोकांना पाहून हल्लेखोर फरार झाले. या प्रकारामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती.

दरम्यान, फिर्यादी व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातून हे टोळीयुद्ध होते का की याला काही इतर कारणे आहेत, अशी चर्चा परिसरात सुरू झालेली आहे. या गोळीबाराने सराइतांकडे असलेले पिस्तूल जप्त करीत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

दरम्यान, गुन्ह्याची माहिती मिळताच शिरूरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी पोलिस कुमक बरोबर घेऊन तातडीने घटनास्थळाला भेट दिली. आरोपींच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT