Liquor Pudhari
पुणे

Shirur Illegal Liquor System: शिरूरमध्ये गावठी दारूवर कारवाईचा दिखावा? यंत्रणेतील त्रुटींमुळे आरोपी सुटत असल्याचा आरोप

पोलिस कारवाईनंतरही पुन्हा सुरू होणारा अवैध धंदा; पंचनामा, प्रयोगशाळा अहवाल आणि तपास प्रक्रियेवर गंभीर प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

निमोणे: गावोगावी गावठी दारूविक्री करणाऱ्यांवर पोलिस धाड टाकून मुद्देमाल जप्त करून गुन्हेही दाखल करतात. मात्र, बहुतांशवेळ हे गुन्हेगार पोलिसांना चकवा देऊन पळून जातात. दुसरीकडे सकाळी कारवाई झाली तरी रात्री पुन्हा त्याच ठिकाणी दारूविक्री सुरू असल्याचे दिसून येते.

या पार्श्वभूमीवर या गावठी अवैध दारूविक्रीचे नेमके गौडबंगाल काय? असा प्रश्न सामान्यांना पडतो. याचे उत्तर या सिस्टिमध्येच दडलेले आहे. शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत फक्त मे महिन्यात 20 हून अधिक गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई झाली. यातील 17 आरोपींना पोलिस अटक करू शकले नाहीत.

कारवाई केल्यानंतर दारूविक्रेता पळून जातो. तसेच अनेकांना फक्त नोटीस देऊन सोडले जाते. काहींना अटक केली तरी कोणताही दारू विक्रेता कोर्टामध्ये गुन्हेगार म्हणून सिद्ध झाल्याच्या घटना कमीच आहेत. कारण गुन्हा दाखल होताना सापडलेल्या मुद्देमालाचा पंचनामा करताना बहुतांशवेळा स्थानिक पंच असतात. हे पंच पुढे कोर्टामध्ये जबाब फिरवतात.

यासह आरोपीला शिक्षा होण्यासाठी जप्त केलेल्या मुद्देमालाची अधिकृत प्रयोगशाळेतून तपासणी होणे गरजेची असते. यातून दारू ही आरोग्यासाठी घातक होती का, हे स्पष्ट होते. मात्र, दारूचे नमुने प्रयोगशाळेत जातात का, त्याचा अहवाल कधी येतो, हा संशोधनाचा विषय आहे. तसेच एखादी केस सुरू झाली तर ती वर्षानुवर्षे चालते. तसेच अधिकाऱ्याची बदली झाली, तर तपासात खंड पडत असल्याचे दिसून येते.

याबाबत शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे म्हणाले, की शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतून अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. अवैध धंद्याबाबत नागरिकांनी निर्भय होऊन पोलिसांशी संपर्क साधावा. ते धंदे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिस यंत्रणा कटिबद्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT