शिरूर : नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी दि. 3 डिसेंबर रोजी होणार असून, संपूर्ण मतमोजणी दोन ते तीन तासांत पूर्ण होऊन निकाल जाहीर होईल.
मतमोजणीकरिता 100 कर्मचारी तर मतदानाच्या दिवशी 190 कर्मचारी असणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित जगताप यांनी दिली. या वेळी कार्यालयीन अधीक्षक राहुल पिसाळ उपस्थित होते.
जगताप यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने दिलेल्या नव्या निर्देशानुसार निवडणुकीचा जाहीर प्रचार सोमवार, दि. 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे. मतमोजणी बुधवार, दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता शिरूर नगरपरिषद नवीन इमारतीत होणार आहे. 36 मतदान केंद्रावरील मतमोजणी होणार आहे.
12 टेबलवर प्रभाग निहाय मतमोजणी होणार आहे, त्याचवेळी नगराध्यक्षपदाचीही मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी दोनवेळा कर्मचारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक प्रचारासाठी उमेदवाराकडून फलक लावले जातात, असे फलक लावताना पालिकेकडून परवानगी घ्यावी लागते व शुल्क भरावे लागते. शहरात 527 फलक लावण्यात आले असून, त्यापोटी नगरपालिकेस 4 लाख 70 हजार रुपये शुल्क प्राप्त झाले आहे.
त्याचबरोबर निवडणूक अर्ज भरण्याच्या कालावधीत 44 लाख 96 हजार रुपयांचा टॅक्स वसूल करण्यात आला आहे. 18002332123 या टोल फी क्रमांकवर तक्रार अथवा सूचना करू शकता, असे आवाहन जगताप यांनी केले.