शिरूर : शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत होत असली तरी या पंचरंगी लढतीमध्ये दोन पाचर्णे हे समोरासमोर आल्याने माजी आमदार दिवंगत बाबूराव पाचर्णे यांचा राजकीय वारसा खऱ्या अर्थाने पुढे कोण चालवणार हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिरूर तालुक्याच्या राजकारणात तसेच शिरूर शहर व पंचक्रोशीच्या राजकारणावर माजी आमदार दिवंगत बाबूराव पाचर्णे यांचा चार दशके दबदबा होता. शिरूर शहर व पंचक्रोशीमध्ये दिवंगत बाबूराव पाचर्णे म्हणतील तसेच राजकीय पटलावर होत होते. पंचक्रोशीतील पाच ग््राामपंचायत व शिरूर शहर त्यांच्या शब्दापुढे कोणीही नव्हते. पाचर्णे यांचे गाव तर्डोबाचीवाडी हे शिरूर पासून दोन किलोमीटर असल्याने शिरूर शहर व त्यांची नाळ कायम जोडली गेली आहे. शिरूर शहराच्या राजकारणामध्ये विधानसभेला शिरूर शहर पाचर्णे यांच्या बाजूला तर नगरपरिषदेला ज्येष्ठ उद्योगपती दिवंगत रसिकलाल धारिवाल यांच्या बाजूला असे गणित अनेक वर्षे होते. हे गणित वर्षानुवर्षे कायम राहिले.
सध्या शिरूर नगरपरिषदेची निवडणूक होत असून या निवडणुकीनिमित्ताने सर्व पक्ष चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांना उमेदवारी दिली आहे. ऐश्वर्या पाचर्णे यांचे पती अभिजित पाचर्णे हे माजी नगरसेवक असून त्यांचे वडील दिवंगत गणेश पाचर्णे तीन वेळा नगरसेवक होते. माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे भावकीत असलेले गणेश पाचर्णे हे दिवंगत बाबूराव पाचर्णे यांच्यामुळे तीन वेळा नगरसेवक झाले.
दुसरीकडे दिवंगत आमदार बाबूराव पाचर्णे यांचे पुत्र तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल पाचर्णे हे भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करीत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी नगराध्यक्षा सुवर्णा राजेंद्र लोळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीन पाचर्णे हे देखील आमदार पाचर्णे यांचे पुतणे असून, ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. राहुल पाचर्णे हे भाजपच्या पॅनेलचे नेतृत्व करीत आहेत. एकूणच या निवडणुकीत दोन्ही पाचर्णे आमने-सामने आले असून दिवंगत आमदार बाबूराव पाचर्णे यांचा राजकीय वारसा कोण पुढे नेणार हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. एकीकडे पाचर्णे नाव तर एकीकडे पक्ष अशा परिस्थितीमुळे शिरूरकर मतदारांसह कार्यकर्त्यांची देखील अडचण झाली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होणार असून, नगराध्यक्षपदी पंचरंगी लढतीत कोण निवडून येईल हे सांगणे आता तरी कठीण असले तरी या निवडणुकीनिमित्त पुन्हा एकदा गावपातळीवर भावकी आमने-सामने आली आहे, हे नक्की.