

ओतूर : पुणे जिल्हा परिषदेच्या ओतूर-धालेवाडी गटातील इच्छुकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट न पहाता थेट प्रचार सुरू केला आहे. काहींनी पक्षाचे तिकीट गृहीत धरून थेट शेतात काम करणारे शेतमजूर, शेतकरी, कष्टकरी यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. ओतूर येथील दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात देखील इच्छुक मतदारांशी थेट संपर्क करीत आहेत. दरम्यान, प्रचारावर बिबट्याने कमालीचा लगाम घातला आहे. निवडणुकीच्या वेळी रात्रीच्या अंधारात उडणारा प्रचाराचा धुरळा या वेळी बिबट्यांच्या दहशतीने पूर्णपणे थांबला आहे.
बिबट्याच्या वावरामुळे मतदारांची रात्रीची भेट महागात पडू शकते. त्यामुळे कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार रात्रीच्या प्रचाराला आवर घालून घरीच थांबणे पसंत करीत आहेत. केवळ दिवसा वाड्यावस्त्यांवर, शेतात, घरोघरी मतदारांची प्रत्यक्ष भेट घेण्यावर भर दिला जात आहे.
ओतूर-धालेवाडी गट हा नागरिकांचा मागास वर्ग महिलांसाठी आरक्षित आहे. या गटातून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असल्याने आम्ही केवळ मतदारांच्या भावना जाणून घेण्यासाठी दौरे करीत असल्याचे एका इच्छुक महिला उमेदवाराने सांगितले. ओतूर-धालेवाडी गटात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा), शिवसेना (शिंदे) व अपक्ष रिंगणात उतरणार असल्याने ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत.