Vote Pudhari
पुणे

Shirur Duplicate Voters Issue: शिरूर तालुक्यात दुबार मतदारांचा मुद्दा ऐरणीवर

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील नावे तत्काळ रद्द करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

निमोणे: नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी अगदी काठावर काही जागा पडल्या, तर काही जागा जिंकल्या, निवडणूक म्हटलं की हार-जित आलीच; मात्र शिरूर तालुक्यातील पुणे-नगर रस्त्यावरील जिल्हा परिषद गट असो की शिरूर ग््राामीण-न्हावरे जिल्हा परिषद गट या ठिकाणी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या मतदारांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये जो काही रंग दाखवला, त्याचा धसका आगामी ग््राामपंचायतच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गाव कारभारी यांनी घेतला आहे. त्यामुळेच मतदार नोंदणी असणाऱ्यांची नावे कोणत्यातरी एक ठिकाणी तत्काळ रद्द करा, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.

औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणातील बाहेरगावातील कामगार औद्योगिक परिसरातील गावांमध्ये स्थिर-स्थावर झाला आहे, रूम भाड्याने जातात, या कारणाने या परिसरातील बहुतांशी जणांनी कॉलनीच्या कॉलनी उभ्या केल्या आहेत. शाश्वत रोजगाराची हमी असल्याने कामगारही त्या ठिकाणी रमतो. औद्योगिक वसाहत असली, तरीही या परिसरातील आजही ग््राामीण टच असल्याने ज्या खोली मालकाच्या खोल्यांमध्ये हे कामगार राहतात, त्यांना सामाजिक सुरक्षा मिळत असल्याने वर्षानुवर्षे ती मंडळी रूम बदलत नाही. स्थानिक मंडळी आपला मतदार वाढला पाहिजे, या भावनेने गावच्या मतदार यादीत या बाहेरच्या कामगारांचे नाव नोंदवून घेतात आणि त्यांना मतदार हे बिरुद मिळाल्यानंतर, खरी कहाणी सुरू होते.

गाव-गाड्याच्या सत्ताकारणावर मांड ठोकण्यासाठी हक्काचा मतदार म्हणून ज्यांना मतदार नोंदणीसाठी मदत केली, तीच माणसं दोन्हीही बाजूंकडून निवडणुकीच्या काळात येणारे गूळ-खोबरं दोन्ही हाताने घेतात व स्थानिकांचं गणित बिघडून टाकतात. बरं यातील बहुतांश लोकांची आपल्या मूळ गावी मतदार म्हणून नोंद असते. त्या भागातील निवडणुका असतील तर ही माणसं आपला मताचा हक्क नोंदवण्यासाठी आपल्या मूळ गावी जातात, हेदेखील वास्तव आहे.

निवडणुका प्रचंड खर्चिक झाल्याने व बाहेरगावचा मतदार हा उगवत्या सूर्याला नमस्कार करीत असल्याने गाव-गाड्यावर मांड ठोकायची असेल, तर दुबार मतदार नकोच, ही भावना आता बळावली आहे. अनेक गावांमध्ये मूळ गावकऱ्यांपेक्षा बाहेरून आलेल्या मतदारांचं वर्चस्व जास्त दिसतं किंवा त्यांनी गाव सोडले असले, तरी त्यांची नावे आजही गावच्या मतदार यादीत असते. ग््राामपंचायत निवडणुकांसाठी याद्या अद्ययावत करण्याचं काम सध्या घडीला युद्ध पातळीवर सुरू आहे.

या वेळी प्रशासनाने दुबार मतदार शोधून काढावे, ज्यांनी आपल्या मूळ गावी मागील पाच वर्षांत मतदानाचा हक्क बजावला आहे त्यांची नावे कमी करावी, ही मागणी होऊ लागली आहे. बाहेरील मतदारांना गाव विकासापेक्षा निवडणुकीच्या आदल्या रात्री होणारे लक्ष्मीदर्शन प्रिय असल्याने त्यांच्या मताचे मोल हे आता गाव कारभाऱ्यांना अवघड जागेचे दुखणे होऊन बसले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT