शिरुर: शिरूर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळूउपशाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगामी काळात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता कशी राहणार, पिकांना पाणी मिळणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत असताना नदीपात्रातील मोठ्या प्रमाणावरील वाळूउपशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का...? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
घोड धरणातील पाणीसाठा आणि त्यावर अवलंबून असलेली शेती ही शिरूर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. यंदा शिरूर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे गरजेचे असताना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात होणारा बेसुमार वाळूउपसा भविष्यात पाणी व्यवस्थापनासाठी अडचण ठरू शकतो.
विशेष म्हणजे वाळूउपशासाठी यांत्रिक बोटींचा वापर होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. संबंधित विभागांकडे तक्रारी, निवेदने आल्यानंतर शिरूर महसूल आणि पोलिस विभागाने संयुक्त कारवाई करत आठ ते दहा वेळा वाळूउपसा करणाऱ्या यांत्रिक बोटीवर कारवाई केली. मात्र, एकाही वाळूमाफियावर गुन्हा दाखल केला नाही. त्यामागे नेमके कारण काय...? त्यामुळे काही दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी पुन्हा वाळूउपसा सुरू होत आहे.
'मलिद्या'च्या चर्चेने संशयाला बळ...?
वाळूउपशाच्या व्यवहाराभोवती मोठ्या आर्थिक उलाढालीच्या चर्चा असतात. त्यामुळे संबंधित विभागातील अधिकारी आणि वाळूउपसा करणाऱ्यांमध्ये 'आर्थिक' हितसंबंध आहेत का...? तसेच घोड पाटबंधारे विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी वाळूमाफियांकडून मोठ्या प्रमाणात 'मलिदा' घेतल्याची सगळीकडे दबक्या आवाजात मोठया प्रमाणात चर्चा सुरू आहे.
प्रशासनाचे एकमेकांकडे बोट
घोड जलसंपदा विभाग, महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाने एकमेकांकडे बोट दाखविण्यापेक्षा संयुक्तपणे घोड धरणातील बेसुमार वाळूउपशावर कारवाई करून कायमस्वरूपी लगाम घालण्याची गरज आहे. कारण वाळूमाफिया सध्या मोकाट सुटले असून, प्रशासनाला अजिबात घाबरत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
घोड जलसंपदा विभागाने नदीपात्रातील वाळूउपशाबाबत आतापर्यंत केलेल्या कारवाईचा संपूर्ण तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणी जोर धरत असून, शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची वाट प्रशासन पाहणार आहे का...? की त्यापूर्वीच घोड नदीतील वाळूउपशावर कठोर आणि कायमस्वरूपी कारवाई करणार...? याचे उत्तर आता घोड जलसंपदा विभागासह महसूल आणि पोलिस प्रशासनाने देणे गरजेचे आहे.