

बावडा: यावर्षी समाधानकारक पाऊस नसल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ड्रॅगन फ्रूटच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने व रोगराईमुळे देखभाल खर्च वाढल्याने चालू वर्षी अपेक्षित असा आर्थिक फायदा झाला नसल्याची खंत ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकरी विजयसिंह मच्छिंद्र कानगुडे (शेटफळ हवेली) यांनी व्यक्त केली.
ड्रॅगन फ्रूटमुळे चांगला आर्थिक आधार प्राप्त होईल, या उद्देशाने कानगुडे यांनी 1 एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटची डिसेंबर २०२३ मध्ये १०×६ फूट अंतरावर सिमेंट खांब लावून ड्रॅगन फ्रूटचा मळा फुलविला. या फळबागेतून त्यांना गेल्या वर्षी चांगले उत्पन्न मिळाले. मात्र, चालू वर्षी चांगले पाऊस पाणी झालेले नसल्याने ड्रॅगन फ्रूट फळाचा आकार मोठा झाला नाही, परिणामी फळाचे वजन वाढले नाही.
चालू वर्षी मे महिन्यात फळ काढणी चालू केली असून, आज पर्यंत सुमारे ७ टन माल विक्री केला. त्यास प्रतिकिलो सरासरी ५० ते ९० रुपये असा दर मिळाला. ऑक्टोबर महिन्यात शेवटची काढणी होणार आहे.
आणखी सुमारे १ टन उत्पन्न निघेल, असा अंदाज कानगुडे यांनी व्यक्त केला. या फळबागेसाठी त्यांना वडील मच्छिंद्र कानगुडे, आई शालनताई, बंधू संजय व पत्नी प्रतिभा याचे सहकार्य मिळत आहे.