शिरूर/निमोणे: पाबळ येथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या पवन अशोक बांदल (वय 32) यांचा मृतदेह करडे (ता. शिरूर) येथील त्यांच्याच शेतातील विहिरीत आढळून आल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन बांदल हे मंगळवारी (दि. 29) सकाळी घरून नेहमीप्रमाणे पाबळ येथे कामावर जात असल्याचे सांगून निघाले होते. त्या वेळी त्यांनी सोबत दप्तर आणि जेवणाचा डबा घेतला होता. (Latest Crime News)
निघताना त्यांच्या भावाने श्रीनिवास बांदल यांनी शेतातील विहिरीवरील मोटर चालू करण्यास सांगितले होते. दरम्यान सुमारे 12.45 च्या सुमारास श्रीनिवास विहिरीकडे गेले असता, त्यांना तिथे पवन यांची गाडी आणि बॅग दिसली. त्यांनी विहिरीत पाहिल्यावर पाण्यात पवन यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
त्यांनी तत्काळ गावातील नागरिकांना व पोलिसांना माहिती दिली. पोलिस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी न्हावरे येथील रुग्णालयात पाठवला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बोथे करीत आहेत. (Pune News)
पवन बांदल यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून तलाठी परीक्षा उत्तीर्ण केली होती. सध्या ते पाबळ येथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.