

राहू: दहिटणे (ता. दौंड) येथील बापूजी बुवा वस्ती परिसरातील भिसे यांच्या वाड्यावरून एका अकरा महिने वयाच्या मुलाला बुधवारी (दि.३०)सकाळी साडेनऊच्या सुमारास बिबट्याने उचलून नेले असल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. संबधित मुलाला आईच्या समोरुन बिबट्याने ओढून नेले असून आईने आरडाओरडा करेपर्यंत बिबट्याने धुम ठोकली.
अन्वनित भिसे असे या मुलाचे नाव असून या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थ मोठे आक्रमक झालेले आहेत. दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असते. या बिबट्याने अनेकदा पाळीव प्राण्यावरही हल्ले केलेले आहेत. या परीसरामध्ये पिंजरा लावण्याची मागणी अनेकदा करुनही वनविभागाने हलगर्जीपणा केला असल्याचा ग्रामस्थाचा आरोप आहे. (Latest Pune News)
दरम्यान वन विभाग व यवत पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने परिसरामध्ये बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असून अद्यापही संबंधित चिमुकल्याचा ठाव ठिकाणा लागला नसल्याची परिस्थिती आहे. या वेळी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. वनविभागाला सातत्याने पाठपुरावा करुनही वनविभाग सुस्त असल्यानेच हा प्रकार घडला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.