मंचर: मंचर (ता. आंबेगाव) येथे महात्मा गांधी विद्यालयाजवळ टपरी चालवणारा दिव्यांग तरुण गणेश सोनवणे (वय 28) यांचा अज्ञात व्यक्तीने खून केला. ही घटना मंगळवारी (दि. 29) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी मंचर पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष बाब म्हणजे मंचरमध्ये पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही घटणा घडली आहे.
याबाबत लक्ष्मण शेटे यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मंचर-शितकलवस्ती येथे पुणे-नाशिक महामार्गाच्या पश्चिम बाजूला बाबा केदारनाथ पान स्टॉल येथे दिव्यांग गणेश सोनवणे हे गेल्या अनेक दिवसांपासून पान टपरीच्या माध्यमातून उदरनिर्वाह करीत होते. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात मारेकऱ्याने गणेश सोनवणे याची हत्या केली. गणेश याची टपरी गॅरेजसमोर होती. हत्येनंतर आरोपीने त्याचा मृतदेह टपरीशेजारी उभ्या असलेल्या जिप्सी कारमध्ये टाकून घटनास्थळावरून पलायन केले. त्याच्या मानेजवळ, पोटाजवळ आणि हातावर कशाने तरी वार केले होते तसेच त्यांच्या अंगामध्ये शर्ट नव्हता.
मृतदेहाजवळ दारूच्या बाटल्या आणि खाण्याच्या वस्तू मिळून आल्या, तर पानटपरीचा दरवाजा उघडा होता. दारूच्या बाटल्या फुटल्यामुळे तेथे काचाही पडलेल्या होत्या. नेमका खून कोणत्या कारणावरून झाला आणि आरोपी कोण होते? याचा तपास लागला नाही. जवळच असलेल्या एका दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे असून, कॅमेर्याची दिशा दुसरीकडे असल्याने ही घटना या सीसीटीव्हीत कैद झाली नाही. (Latest Pune News)
त्यामुळे पोलिसांना आरोपींपर्यंत पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, खून झाल्याची घटना वार्यासारखी मंचर शहरात पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी येथे गर्दी केली होती. मंचर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील धनवे पुढील तपास करीत आहेत.