Drug Pudhari
पुणे

Shirur Election Drug Abuse: शिरूर तालुक्यात निवडणुकांच्या आड ड्रग्जचा फैलाव?

निवडणूक पैशांतून तरुणाई नशेच्या गर्तेत; भवितव्याबाबत वाढती चिंता

पुढारी वृत्तसेवा

बापू जाधव

निमोणे: जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा वापर झाला आहे. निवडणुकीच्या माध्यमातून हाती आलेल्या पैशांतून अनेक सामान्य कुटुंबातील तरुणांनी परवडत नसलेल्या ड्रग्ज खरेदीला प्राधान्य दिल्याची चर्चा आहे. या प्रकारातून तरुणांचे भवितव्य नेमके कोणत्या मार्गाने जात आहे, असा प्रश्न शिरूरमधील जाणकार मंडळी उपस्थिती करू लागली आहेत.

निवडणुका येतात-जातात, त्यात कुणीतरी जिंकतो-हारतो. लोकशाहीत हे अपेक्षितच आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून निवडणुकीत अफाट पैसा खर्च करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. यातून गावोगावच्या कार्यकर्त्यांसाठी ओल्या-सुक्या पार्टीसारख्या सर्व सोयी केल्या जातात. मतदारांना ‌’लक्ष्मी दर्शन‌’ दिले जाते. ही बाब आता सामान्य म्हणूनच गणली जाते. मात्र, या निवडणुकीत शिरूर तालुक्यातील पुणे-नगर रस्त्यावरील एका जिल्हा परिषद गटात कार्यकर्त्यांना कार्यप्रवण करण्यासाठी ड्रग्सचा वापर केल्याची चर्चा सुरू झाली आहे. ‌’स्टार्टर‌’ रूपात आलेली पाकिटे युवा वर्ग नक्की कुठे खर्च करतो याचा ताळेबंद कुणीच मांडू शकत नाही.

मात्र, मोठ्या प्रमाणात हा पैसा दुर्दैवाने ड्रग्स रॅकेट चालवणाऱ्या दलालांच्या अड्ड्‌‍यावरती खर्च झाल्याचे बोलले जाते. कालपर्यंत सामान्य कुटुंबातील तरुणाला हे ड्रग्ज महाग वाटत होते. ते या निवडणुकीच्या माध्यमातून त्याच्या थेट खिशात गेले आहे. दरम्यान, शिरूरच्या वाड्या-वस्त्यांवर एमडी ड्रग्सचा विळखा पडला आहे. यात युवा पिढी पूर्णपणे होरपळून गेली आहे. नशेचे सौदागर साखळी पद्धतीने तरुण पिढीला आपल्या जाळ्यात घेत असल्याचे वास्तव वेळोवेळी पोलिस कारवाईतून उघड झाले आहे. मात्र, या निवडणूक काळात बिनबोभाट ड्रग्जची खेडोपाडी उलाढाल झाली आहे.

परिणामी तालुक्यातून तरुणाईच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आहे. नशेची तलफ भागवण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग पत्करणारी युवा पिढी ही आता कार्यकर्ते आणि मतदार होती. त्यांचे लाड पुरवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणातील दोन्ही बाजूंकडून कसलीच कसर बाकी ठेवली नाही. कोट्यवधी रुपये पणाला लावून निवडणुकीच्या या लढाईत ड्रग्जच्या माध्यमातून तरुणांच्या भविष्याचाही खेळ खेळला गेल्याचे दुर्दैवी चित्र शिरूर तालुक्यात पाहायला मिळाल्याचे काही पराभूत, जिंकलेल्या उमेदवारांसह नागरिकांनी सांगितले.

आता निवडणुका संपल्या आहेत. विकासा साठी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आता लोकप्रतिनिधी निवडले गेले आहेत. आता हे लोकप्रतिनिधी आपल्या जनतेच्या भवितव्यासाठी तालुक्याला पडलेल्या ड्रग्जचा विळखा तोडण्यासाठी काय प्रयत्न करतात, याकाडे संपूर्ण शिरूरकरांचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT