Liquor Pudhari
पुणे

Shikrapur Illegal Liquor Action: शिक्रापूरमध्ये हातभट्टी दारूविरोधात कडक कारवाईचे आदेश; अधिकाऱ्यांना शिस्तभंगाचा इशारा

बेकायदेशीर दारू निर्मितीवर तातडीने प्रतिबंध; ग्रामपंचायत यंत्रणेला कडक सूचना

पुढारी वृत्तसेवा

शिक्रापूर: ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री केंद्रांवर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी दिले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील आणि तलाठी यांच्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

यासंदर्भातील पत्र जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम १३४ नुसार गावात सुरू असलेल्या अवैध मद्यनिर्मिती, गुन्हेगार, गूळ व्यापारी, कच्चा माल पुरवठादार

तसेच बेकायदेशीर मद्याशी संबंधित माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला देणे हे सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील आणि तलाठी यांच्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, संबंधित जागेच्या मालकी हक्काची माहितीही तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

परिपत्रकानुसार अवैध हातभट्टी दारूनिर्मिती केंद्र प्रामुख्याने ओढे, नाले, नदीकाठ, गायरान, सामाजिक वनीकरण आणि वन विभागाच्या जागांवर आढळून येतात. त्यामुळे अशा सरकारी जागांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सरकारी जागांचा बेकायदेशीर वापर करणाऱ्या संशयित व्यक्तींवर पाळत ठेवून त्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवावी, तसेच अवैध हातभट्टी आणि गावरान दारूनिर्मिती केंद्रांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला सर्वतोपरी सहकार्य करावे, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT