Shetfal Lake Water Supply Pudhari
पुणे

Shetfal Lake Water Supply: कालव्याच्या पाण्याला आता सुरक्षेचे कवच! चोरी रोखण्यासाठी ८ सुरक्षा रक्षक तैनात

निरा डावा कालव्यातून सोडलेल्या पाण्याची चोरी रोखण्यासाठी जलसंपदा विभागाची उपाययोजना; शेतकऱ्यांना पाणीटंचाईतून दिलासा मिळण्याची आशा

पुढारी वृत्तसेवा

इंदापूर: निरा डावा कालव्याद्वारे शेटफळ तलावासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाणी शेटफळपर्यंत पूर्ण दाबाने पोहचावे आणि मध्ये पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी जलसंपदा विभागाने यंदा कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे.

पाण्याच्या सुरक्षेसाठी पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे ८ जवान तैनात करण्यात आले आहेत. यामुळे पाण्याला आता सुरक्षाकवच मिळाल्याचे दिसून येत आहे.

याबाबत जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता व्ही. पी. काटे, सहाय्यक अभियंता रोहित झणझणे आणि शाखा अभियंता रतन झगडे यांनी सांगितले की, निरा डावा कालव्यातून शेटफळ तलावात पाणी सोडणे सुरू आहे. हे पाणी पूर्ण दाबाने जावे, यासाठी हेडवर पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे ८ जवान तैनात करण्यात आले आहेत.

हे सर्व रक्षक भोर तालुक्यातील असून, यामध्ये अरुण तुपे, पांडुरंग कुमकर यांच्यासह अन्य जवानांचा समावेश आहे. हे रक्षक कालव्याच्या कडेला दिवसरात्र गस्त घालणार असून, प्रत्येक फाट्याच्या हेडवर लक्ष ठेवणार आहेत.

गेल्या अनेक आवर्तनात शेतकरी रात्रीच्या वेळी कालव्याच्या फाट्याच्या हेडवरील चिमणी (छोटे गेट) उघडून बेकायदेशीरपणे पाणी आपल्या शेतात घेत होते. त्यामुळे शेटफळ तलावापर्यंत पाणी कमी दाबाने पोहचत होते व तलाव पूर्ण भरत नव्हता. हीच चोरी रोखण्यासाठी या वेळी विभागाने संरक्षणात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

जलसंपदा विभागाने आवाहन केले आहे की, कुठेही फाट्याच्या हेडवर शेतकऱ्यांनी बेकायदेशीरपणे पाणी चोरू नये. जर कोणी चोरी करताना आढळला तर त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

या आवर्तनामुळे शेटफळ तलाव भरल्यानंतर या परिसरातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही दिवसांसाठी सुटणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता होती, आता या आवर्तनामुळे दिलासा मिळणार आहे.

पाणीटंचाई कमी होण्याची शक्यता

यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. या कालव्याच्या पाण्यावरच पुढील आठ महिने पिण्याचे व शेतीचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी विभागाला सुरक्षा रक्षक तैनात करावे लागत आहेत. या आवर्तनामुळे तलाव भरल्यास परिसरातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT