पुणेः मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शीतल तेजवानीच्या कोरेगाव पार्क आणि पिंपरी येथील घरी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि.5) झडती घेतली. त्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार केली होती. कोरेगाव पार्कमधील लेन क्रमांक सातमध्ये तेजवानी वास्तव्यास आहे. दुपारी पोलिसांचे पथक तिला गाडीत घेऊन तिच्या घरी गेले. यावेळी तेथे मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता, तर दुसरीकडे तिच्या माहेरच्या पिंपरी येथील घरीसुद्धा दुसऱ्या पथकाने झडती घेतली.
दरम्यान, या झडतीत नेमकं पोलिसांच्या हाती काय लागले हे मात्र समजू शकले नाही. कोरेगाव पार्क येथील झडतीच्या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ, परिमंडळ 2 चे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी भेट दिली. दुपारी 2 ला तेजवानीच्या घरी दाखल झालेले पथक सायंकाळी तिला घेऊन परतले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेल्या अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, तहसीलदार सूर्यकांत येवले आणि शीतल तेजवानी यांच्यावर खडक पोलिस ठाण्यात मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल आहे. दोन दिवसांच्या चौकशीनंतर तेजवानीला बुधवारी दुपारी पोलिसांनी अटक केली.
तेजवानीने 2006 मध्ये तब्बल 275 जणांकडून जमीन मिळवण्यासाठी ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ घेतली होती. त्यानंतर 2025 मध्ये पार्थ पवार संबंधित अमेडिया कंपनीशी करार करून ही जमीन हस्तांतरित केली. तेजवानीला अटक केल्यानंतर न्यायालयाने तिला 8 डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.
दिग्विजय पाटीलची पुन्हा चौकशी?
पार्थ पवार यांचा मामेभाऊ दिग्विजय पाटील हा अमेडिया कंपनीत भागीदार आहे. त्याच कंपनीसोबत तेजवानीने मुंढवा येथील जमिनीचा व्यवहार केला आहे. पाटीलवरदेखील खडक पोलिस ठाण्यात याबाबत गु्न्हा दाखल असल्याने त्याचीसुद्धा आर्थिक गुन्हे शाखेने 1 डिसेंबरला चौकशी करून त्याचा जबाब नोंदवला आहे. दरम्यान, आता पुन्हा 8 डिसेंबरला पाटीलची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाच्या अनुषंगाने चौकशी करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.