नारायणगाव: आदिवासी विभागाला मूर्ख मंत्री भेटलाय आणि हा अधिकारीदेखील चोर, आम्ही काय कोणाच्या बापाला बांधील आहे का? कोणाचा रुपाया खात नाही, अशी मुक्ताफळे उधळली आहेत, जुन्नरचे अपक्ष, शिंदे शिवसेनेचे सहयोगी आमदार शरद सोनवणे यांनी.
जुन्नर तालुक्यातील सर्व खात्यांच्या प्रशासकीय अधिकार्यांची बैठक आ. सोनवणे यांनी शुक्रवारी (दि. 25) बोलवली होती. या बैठकीमध्ये आदिवासी विकास विभागाचा आढावा घेताना आ. सोनवणे यांनी मंत्री, अधिकारी यांच्या बद्दल अपशब्द वापरले. आदिवासी समाजाच्या प्रश्नावरून मूर्ख मंत्री व चोर अधिकारी असा शब्दप्रयोग त्यांनी केला. (Latest Pune News)
‘तुम्ही मंत्र्यांच्या फार पुढे पुढे करता’ असे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांना त्यांनी सुनावले. मी मंत्र्यांचेदेखील कान उघडतो. मूर्ख मंत्री भेटलाय या खात्याला.. मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि या सगळ्यांची झाडाझडती करणार..! मी आतापर्यंत कितीतरी अधिकारी भिकेला लावलेत, असे देसाई यांना सुनावत ते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, आदिवासी नेते देवराम लांडे यांच्यावरही गुरकले. जनता महत्त्वाची आहे, अधिकारी महत्त्वाचा नाही, असे त्यांनी लांडे यांना सुनावले.
दरम्यान, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्याकडून जुन्नर तालुक्यात आदिवासी विभागात कोणकोणती कामे चालू आहेत, याबाबतची आ. सोनवणे यांनी माहिती घेतली. आपल्या विभागाबद्दल व आपल्याबद्दल बर्याच तक्रारी आहेत, असे या वेळी त्यांनीदेसाईंना सांगितले.
जुन्नर तालुक्यात आदिवासी गावे जास्त आहेत व आंबेगाव तालुक्यात कमी आहेत. मात्र, जुन्नर तालुक्यात विकास निधी कमी का, असाही प्रश्न त्यांनी केला. आदिवासी विकासमंत्री अशोक उईके व प्रदीप देसाई आपलेही काम चांगले नाही, अशी खंत या वेळी त्यांनी देसाई यांच्याशी बोलताना व्यक्त केली.