Lonavala Accident News
लोणावळा: ब्रेक फेल झालेल्या भरधाव कंटेनरने 25 वाहनांना धडक दिली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, 21 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवार (दि. 26) दुपारी दोनच्या मुंबईकडे जाणार्या मार्गावर खोपोली एक्झिट येथील नवीन बोगदा ते फूड मॉलदरम्यान घडली.
लोणावळा-खंडाळा परिसरामध्ये मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणार्या कंटेनरचा क्र. (एमएच 46 बीयू 3506) ब्रेक फेल झाल्याने पुढे जाणार्या वाहनांना धडक देत गेला. (Latest Pune News)
कंटेनरचा वेग जास्त असल्याने सुमारे 20 ते 25 वाहनांना धडक बसली. या धडकेत वेगवेगळ्या वाहनांमधील 21 जण जखमी झाले आहेत. तर एका स्कॉर्पिओ गाडीमधील महिला अनिता सहदेव एकंडे (55, रा. धाराशिव) यांचा या घटनेत मृत्यू झाला. या भीषण अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अपघाताची माहिती समजताच खोपोली येथील हेल्प फाउंडेशन, खंडाळा बोरघाट पोलिस, आयआरबी, डेल्टा फोर्स खोपोली पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहनांमधील जखमींना बाहेर काढत उपचारासाठी खोपोली व कामोठे या ठिकाणी रवाना केले आहे.
मुंबईकडे जाणार्या मार्गिकेवर हा अपघात झाल्यामुळे या परिसरामधील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. या अपघातप्रकरणी अधिक तपास खोपोली पोलिस करत आहेत.