बारामती: मराठा आरक्षणप्रश्नी ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्याकडे बोट दाखविणाऱ्या ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पवार यांनी समाचार घेतला. १९९४ पासून आजपर्यंत तुम्ही काय करत आहात? आजपर्यंत तुम्ही सत्तेमध्येच आहात ना? असा खडा सवाल खा. पवार यांनी केला. शिवाय त्यांच्या टीकेला आपण महत्त्व देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
बारामतीत पवार हे पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणप्रश्नी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे उपोषण करीत आहेत. पवार म्हणाले, काही मंत्री तिथे जात आहेत. ते काय निर्णय सांगणार आहेत ते पाहिले पाहिजे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना पवार यांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याची संधी दिली पाहिजे, अशी भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या काही मागण्या आहेत. सरकारने स्वीकारलेले धोरण चुकीचे असल्याचे न्यायव्यवस्थेने स्पष्ट केले. प्रशासन आणि न्यायव्यवस्थेच्या भूमिकेबाबत आज निर्माण झालेली परिस्थिती चिंताजनक असल्याचेही त्यांनी सांगितले
अर्थव्यवस्था अडचणीत
देशाच्या तिमाही जीडीपीच्या आकडेवारीबाबत बोलताना पवार म्हणाले की, अर्थमंत्री व पंतप्रधान अर्थव्यवस्थेचे अतिशय सुंदर चित्र असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, अर्थव्यवस्थेतील मूळ प्रश्नांकडे त्यांचे लक्ष नसल्याचे दिसते.
लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काही मुद्दे मांडले जात असून, देशातील वस्तुस्थिती बाजूला ठेवली जात आहे. आगामी काळात याचा परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होईल. साखरेच्या वाढत्या दराचा ऊस उत्पादकांना अद्याप अपेक्षित फायदा झालेला दिसत नाही, असे खा. पवार यांनी सांगितले.
शिवसेनेबाबत आत्ताच सांगू शकत नाही
शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत मी सध्या सांगू शकत नाही. अजून सुनावण्या सुरू आहेत. त्याआधी आपण काय भाष्य करायचं?. युक्तिवादानंतर आठ-दहा दिवसांनी काय ते कळेल, असे शरद पवार म्हणाले.
पंतप्रधानांना निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येणार असून, त्यासाठी १६ ऑक्टोबरची तारीख देण्यात आली आहे. मात्र, या दौऱ्याच्या तारखेत पुढे-मागे होण्याची शक्यता आहे. बारामतीत उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) संस्थेची पंतप्रधान मोदी पाहणीकरणार आहेत.