पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्यानंतर शरद पवार यांच्या गटाच्या पुणे शहरातील नेत्यांनी आयोगाचा हा निर्णय दुर्दैवी असून, आमचा पक्ष व चिन्ह शरद पवार हे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. माजी महापौर व प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले, दिल्लीच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेची मान्यता आणि चिन्ह दिले. त्यानुसार निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीबाबत दिलेला निर्णय आम्हाला अपेक्षित होता. आमचे 1999 पासून चिन्ह घड्याळ हे गेले, याचे आम्हाला दुःख आहे.
पण, हे दुःख आम्ही उरावर बाळगणार नाही. पवारसाहेब आणि वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, जे काही चिन्ह घेतील, ते आम्ही घराघरांमध्ये पोहोचवू. शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे केवळ चिन्ह नव्हे, तर लोकनेते शरद पवार यांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे. चिन्ह आणि नाव गेले तरी पवारसाहेब आमच्याकडे आहेत, साहेबांचा विचार आमच्याकडे आहे. म्हणूनच, यापुढे साहेब हेच आमचे चिन्ह आणि साहेब हाच आमचा पक्ष मानून आम्ही ही लढाई लढू, असेही सांगतिले.
हेही वाचा