Politics : अजित पवार गटाचा फटाके फोडून, पेढे भरवून आनंदोत्सव

Politics : अजित पवार गटाचा फटाके फोडून, पेढे भरवून आनंदोत्सव

पुणे : पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिल्याचा आनंद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवून साजरा केला. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत जल्लोष केला.

नारायण पेठेतील गुप्ते मंगल कार्यालयासमोर करण्यात आलेल्या जल्लोषात शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी नगरसेवक दत्ता सागरे, हर्षवर्धन मानकर, संतोष नांगरे, अर्चना चंदनशिवे, विशाल अग्रवाल, संगीता बराटे, संतोष बेंद्रे, योगेश वराडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. दीपक मानकर म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा अजित पवार यांनी आजवर केलेल्या कामाचा सन्मान आहे. आयोगाच्या आजच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह देखील अजित पवार यांचे आहे, हे सिद्ध झाले आहे.

आयोगाच्या या निर्णयाने सर्वसामान्य जनतेला आणि आम्हा कार्यकर्त्यांना आनंद झाला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करतो. अजित पवार यांना पक्ष व चिन्ह मिळाल्याने मीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झालोय, हा भाव प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. या घटनेचा आम्ही पुण्यामध्ये जल्लोष करीत आहोत. प्रदीप देशमुख म्हणाले, निवडणूक आयोगाचा निर्णय हा लोकशाहीचा विजय आहे. आयोगाने संसदीय बहुमतावर निर्णय दिला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news