पुणे : पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. रविवारी पुण्यातील मोदीबाग येथील निवासस्थानी पुरंदर बाधित शेतकऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी अजित पवार यांना फोन करून या प्रश्नावर तातडीने बैठक घेण्याच्या सूचना केल्या.
पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांच्या लढ्याचे नेतृत्व करणारे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी या भेटीची माहिती दिली. ते म्हणाले, "पुरंदर विमानतळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत शरद पवार यांनी अजित पवार यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने बैठक घेऊन तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी उपमुख्यमंत्री यांना केल्या आहेत."
यापूर्वी मोदीबागेतूनच शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही फोन करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते बैठकीत व्यस्त असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांना फोन केला, अन त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यावर तातडीने तोडगा काढण्यास सांगितले, तसेच, याकरिता बैठक बोलावण्याच्याही सूचना त्यांनी केल्या. यावेळी येथे आलेल्या शेतकऱ्यांनी आमच्या सात गावातील जमिनीचा कणभरही तुकडा देणार नाही, असे ठणकावून सांगितले.