पुणे

शिक्रापूर परिसरात तीव्र पाणीटंचाई; चासकमान कालव्यातून पाणी सोडा

Laxman Dhenge

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : तब्बल 50 हजार लोकसंख्येपर्यंत नागरीकरण झालेल्या शिक्रापुरात (ता. शिरूर) उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. गावाला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीचा उद्भव बंद झाला आहे. त्यामुळे गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तातडीने चासकमान कालव्याच्या 13 नंबरच्या चारीमध्ये पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. वेळ नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यावर शिक्रापूरला पाणी पुरवठा करणारी विहीर आहे. मात्र ही विहीर आटली आहे. बोअरवेलची पाणीपातळी देखील खालावली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

जनावरांचे पाण्यावाचून हाल होऊ लागले आहेत. ग्रामस्थांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. अनेक जण पाण्याचा टँकर घेताना दिसत आहेत. 8 हजार लिटर पाण्याच्या टँकरसाठी एक हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे चासकमान कालव्याच्या 13 नंबरच्या चारीमध्ये पाणी सोडावे. जेणेकरून येथील वेळ नदीवरील कोरडा पडलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा भरला जाईल व शिक्रापूरकरांची पाण्याच्या संकटातून मुक्तता होईल. शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांनी या चारीला पाणी सोडण्याबाबतची मागणी चासकमान प्रकल्प उपविभागाकडे केली आहे. यंदा चासकमान कालव्यातून या चारीला पाणी देण्यासाठी तब्बल 20 दिवस उशीर झाला आहे. त्यामुळे तातडीने चासकमान प्रकल्प विभागाने या चारीला पाणी सोडून शिक्रापूरकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी सरपंच गडदे यांनी केली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT