‘पुरंदर उपसा’च्या पाण्यासाठी अजून 20 दिवस | पुढारी

‘पुरंदर उपसा’च्या पाण्यासाठी अजून 20 दिवस

दिवे : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू होत आहे. योजनेचे वेळापत्रकदेखील तयार करण्यात आले आहे. मात्र या वेळापत्रकानुसार दिवे परिसरातील शेतकर्‍यांना आणखी 20 दिवस पाण्याची वाट पहावी लागणार आहे. वेळापत्रक तयार करत असताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. तसेच दिवेपर्यंत समान पाणीवाटप करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारादेखील शेतकर्‍यांनी दिला आहे.

पुरंदर तालुक्यातील दिवेसह काळेवाडी, झेंडेवाडी, जाधववाडी, पवारवाडी, ढुमेवाडी, सोनोरी परिसरात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर झाला आहे, नागरिकांचे पाण्यावाचून हाल सुरू झाले आहेत. शेतीपिके अन् फळबागा तर अक्षरशः शेवटच्या घटका मोजत आहेत. या परिसराचे भवितव्य पुरंदर उपसा जलसिंचन योजनेवर अवलंबून आहे. ऐन दुष्काळात ही योजना एक महिना बंद होती. ती महिन्यानंतर सुरू होत असून त्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र हे तयार करत असताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. या वेळापत्रकानुसार दिवेकरांना अजून तब्बल 20 दिवस पाण्याची वाट पाहावी लागणार आहे.

या भागातील अंजीर, सीताफळबागांना जर वेळेवर पाणी मिळाले नाही तर या फळबागा उद्ध्वस्त होतील. त्यामुळे हे वेळापत्रक पाहून शेतकर्‍यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दिवे परिसर हा शेवटच्या टप्प्यात येतो आणि या भागावर पाणीवाटपात नेहमीच अन्याय होतो, असा शेतकर्‍यांचा आरोप आहे. त्यासाठी वाघापूर चौफुला येथील दोन पंप कायमस्वरूपी सुरू करून दिवेपर्यंत समान पाणीवाटप करावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी समीर काळे, मुरलीधर झेंडे, अरुण काळे, माऊली काळे आदींसह शेतकर्‍यांनी दिला आहे.

हेही वाचा

Back to top button