पुणे

अतिदुर्गम हारपुड येथे भीषण पाणीटंचाई : ‘जलजीवन’चे काम अर्धवट; ठेकेदार पसार

Laxman Dhenge

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : रायगड व पुणे जिल्ह्यांच्या हद्दीवरील उंच डोंगरावर अतिदुर्गम हारपुड (ता. राजगड) येथील ब्राह्मणखिंड धनगर वस्तीसह परिसरातील वाड्यांत गेल्या तीन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सुरू आहे. येथील लाखो रुपये खर्चाच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट सोडून ठेकेदार पसार झाला आहे. या ठेकेदाराने एका खासगी संस्थेने बांधून दिलेली विहीर फोडून त्या ठिकाणी नवीन विहिरीचे काम अर्धवट ठेवले आहे. त्यामुळे कडकडीत उन्हाळ्यात यंदा विहिरीचे पाणीही मिळत नाही.

सध्या हंडाभर पाण्यासाठी महिला, मुले रणरणत्या उन्हात पायपीट करत आहेत. दूर अंतरावरील कडे-कपारीत मिळेल तेथून पाणी वाहून आणण्यासाठी रहिवाशांना दररोज मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्याने डोंगर कड्यातील पाणवठे कोरडे ठणठणीत पडले आहेत. सह्याद्रीच्या उंच डोंगरावर अतिदुर्गम ब्राह्मणखिंडीत जाण्यासाठी बारमाही पक्का रस्ता नाही.

पाण्यासाठी महिलांची मृत्यूशी झुंज

ब्राह्मणखिंड वस्तीची लोकसंख्या दीडशेहून अधिक आहे. माणसांपेक्षा गाई, बैल शेळ्या अशा जनावरांची संख्या अधिक आहे. जवळपास पाणी नसल्याने तीन ते चार किलोमीटर अंतराची पायपीट करून महिला, मुलांना पाणी आणावे लागत आहे. त्यासाठी महिला, मुलांना दररोज उंच डोंगरकड्यात अक्षरशः मृत्युशी झुंज द्यावी लागत आहे.

चार महिन्यांपूर्वी ठेकेदाराने पाणी योजनेचे काम सुरू केले. पाण्याची टाकीही बांधली. मात्र, चांगली विहीर जमिनदोस्त केली आणि नवीनही बांधली नाही. त्यामुळे पाण्याची मोठी टंचाई आहे.

-पांडुरंग कचरे, स्थानिक रहिवासी.

पाण्याअभावी नागरिक, जनावरे त्रस्त झाली आहेत. पावसाळ्यापूर्वी पाणी योजनेचे काम पूर्ण करावे.

– तानाजी कचरे, कार्यकर्ते, मावळा जवान संघटना.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT