राज्यात उद्या सेट परीक्षा!  File Photo
पुणे

SET Exam: राज्यात उद्या सेट परीक्षा!

सेट परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होणार असल्याची विद्यापीठ प्रशासनाची माहिती

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरिता 18 शहरांमधील विविध महाविद्यालयात उद्या रविवारी (दि. 15) सेट परीक्षेचे आयोजन केले आहे. संबंधित 40 वी सेट परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या ‘सेट’ विभागाने दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सेट’ परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरीष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरिता प्राधिकृत विभाग आहे.  (Latest Pune News)

त्यानुसार सेट विभागामार्फत उद्या 40 वी सेट परीक्षा घेतली जाणार आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील एक लाख 10 हजार 412 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. विद्यापीठातर्फे 18 शहरांमध्ये 256 महाविद्यालयामधील 469 ब्लॉकमध्ये 32 विषयांची परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

विद्यापीठाने आत्तापर्यंत 39 परीक्षा घेतल्या आहेत. एकाही परीक्षेत गैरप्रकार झाला नसल्याचा विद्यापीठाचा इतिहास आहे. विद्यापीठातर्फे परीक्षेबाबत प्रचंड गोपनीयता पाळली जाते; परंतु नुकताच इतिहास विषयाचा ‘सेट’ परीक्षेचा पेपर फुटला असल्याची अफवा पसरल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने जाहीर प्रकटनाद्वारे यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

विद्यापीठातर्फे घेतल्या जाणार्‍या ‘सेट’ परीक्षेबाबत विद्यापीठाकडून नेहमीच काळजी घेतली जाते. त्यामुळे परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटण्याचा कुठलाही प्रश्न उपस्थित होत नाही. परंतु, सोलापूर जिल्ह्यातून प्रश्नपत्रिका फुटल्याचे वृत्त एका युट्यूब चॅनेलने प्रकाशित केले आहे. विद्यापीठाने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांकडे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, तसेच संबंधित परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT