

पुणे: दुचाकी, चारचाकींचे आयुर्मान आरटीओच्या नियमानुसार साधारणत: 15 वर्षांचे असते. ग्रीन टॅक्स भरून अन्य प्रक्रिया केली तर त्या वाहनाचे आयुर्मान पाच वर्षांनी वाढवून दिले जाते. मात्र, विमानांचे आयुर्मान किती असते? असा प्रश्न अनेकांना पडतो. विमानांचे आयुर्मान केवळ वर्षांवर नाही, तर सायकल्स (विमानोड्डाणांचे टेकऑफ आणि लँडिंग) आणि उड्डाण तासांवर ठरत असते, याच गोष्टींचा विचार करून विमान कंपन्या आपल्या विमानाला सेवानिवृत्त करतात.
आकाशात भरारी
घेणारी विमाने आपल्यासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिली आहेत. त्यांचे आयुर्मान किती असते, त्यांची देखभाल कशी होते आणि त्यांचे विविध प्रकार कोणते, याबद्दल अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात असतात. यासंदर्भात पुण्यातील प्रसिद्ध हवाई वाहतूकतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांच्याशी दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने संवाद साधला. त्यांनी या वेळी बोलताना विमानांच्या या गुंतागुंतीच्या जगावर प्रकाश टाकला. (Latest Pune News)
...असे ठरते विमानाचे आयुर्मान
हवाई वाहतूकतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामान्यतः व्यावसायिक प्रवासी विमानांचे आयुर्मान 25 ते 30 वर्षे असते. मात्र, हे केवळ वर्षांवर अवलंबून नसते. विमानाचे आयुर्मान ठरवताना उड्डाणांचे तास आणि सायकल्स हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे असतात.
सायकल्स म्हणजे विमान किती वेळा टेकऑफ (उड्डाण) आणि लँडिंग (खाली उतरले) झाले, हे मोजणे. प्रत्येक टेकऑफ आणि लँडिंगमुळे विमानाला विशिष्ट ताण सहन करावा लागतो. त्यामुळे एखादे विमान किती तास उडाले किंवा किती वेळा जमिनीवर उतरले, यावर त्याचे आयुष्य ठरते, केवळ ते किती जुने झाले, यावर नाही, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
विमानांचे प्रकार आणि गरजेनुसार डिझाइन केलेले वैविध्य
व्यावसायिक प्रवासी विमाने :- यात शॉर्ट- हॉल (कमी अंतर), मीडियम- हॉल (मध्यम अंतर) आणि लाँग- हॉल (लांब पल्ल्याची) विमाने येतात. बोईंग 737 आणि एअरबस- 320 सिरीजची विमाने शॉर्ट-हॉलसाठी, तर बोईंग 747 (जंबो जेट), बोईंग 777 आणि एअरबस- 380 (सुपरजंबो) ही लाँग- हॉलसाठी वापरली जातात.
कार्गो विमाने :- केवळ मालवाहतुकीसाठी वापरली जातात.
खासगी विमाने :- व्यक्तींच्या किंवा कंपन्यांच्या खासगी वापरासाठी असतात.
लष्करी विमाने :- यात लढाऊ विमाने, बॉम्बर विमाने आणि परिवहन विमानांचा समावेश असतो.
देखभालीचे मुख्य प्रकार असे आहेत...
लाइन मेंटेनन्स :- प्रत्येक उड्डाणापूर्वी आणि उतरल्यानंतरची तपासणी.
ए-चेक आणि बी-चेक :- ठरावीक उड्डाण तासांनंतर किंवा महिन्यांनंतर होणार्या किरकोळ तपासण्या.
सी- चेक :- दर 20-24 महिन्यांनी (किंवा 4000- 6000 उड्डाण तासांनंतर) होणारी मोठी तपासणी, यात विमानाचा काही भाग उघडून अंतर्गत तपासणी केली जाते.
डी- चेक (हेवी मेंटेनन्स) :- दर 6-10 वर्षांनी होणारी सर्वात मोठी आणि विस्तृत तपासणी. यात जवळपास पूर्ण विमान वेगळे केले जाते. जुने भाग बदलले जातात आणि नव्याने रंग दिला जातो. ही प्रक्रिया अत्यंत खर्चिक आणि वेळखाऊ असते.
बोईंग आणि एअरबस :- भारतीय हवाई क्षेत्रातील प्रमुख खेळाडू
भारतामध्ये बोईंग आणि एअरबस या दोन्ही कंपन्यांची विमाने मोठ्या प्रमाणात वापरली जातात. भारतीय हवाई कंपन्यांमध्ये एअरबस- 320 सिरीजची विमाने अधिक संख्येने आहेत. कारण, इंडिगोसारख्या मोठ्या एअरलाईन्स प्रामुख्याने ही विमाने वापरतात, असे तज्ज्ञांनी सांगितले. त्याचबरोबर, एअर इंडिया आणि इतर कंपन्या बोईंग 737, 777 आणि 787 (ड्रीमलाइनर) यासारख्या विमानांचाही मोठ्या प्रमाणावर वापर करतात.
पुण्यातील विमान प्रकारांची स्थिती
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यतः शॉर्ट- हॉल ते मीडियम- हॉल विमानांची (बोईंग 737 सिरीज आणि एअरबस -320 सिरीज) वर्दळ जास्त असते. मोठ्या वाइड- बॉडी विमानांसाठी (उदा. बोईंग 747 किंवा एअरबस -380) मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सोयीस्कर पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.
विमानांची देखभाल दुरुस्ती ही अत्यंत काटेकोरपणे आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार केली जाते. देखभाल दुरुस्ती फक्त काही किलोमीटर झाल्यावर केली जात नाही, तर ती उड्डाणांचे तास आणि सायकल्स (विमानोड्डाणांचे टेकऑफ आणि लँडिंग) यानुसार निश्चित केली जाते. विमान कंपन्यांना याचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असते.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ