पुणे

धायरी : सेवा रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी? नर्‍हे परिसरातील नागरिकांचा सवाल

अमृता चौगुले

धायरी(पुणे) : मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत नर्‍हे परिसरातील नवले पूल ते भुमकर पुलापर्यंतच्या सेवा रस्त्यावरील अतिक्रमणांवर गेल्या वर्षी कारवाई करण्यात आली. त्यानंतर एक वर्षाचा कालावधी लोटला असला, तरी प्रशासनाला अद्यापही या रस्त्याच्या डांबरीकरणासह इतर कामे अद्यापही करता आली नाहीत. यामुळे वाहनचालकांसह नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षी परिसरातील सेल्फी पॉईंटजवळ सहा, सात वाहनांचा अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे झाले. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका व पीएमारडीएच्या माध्यमातून सेवा रस्त्यावरील टपर्‍या, कच्ची व पक्की बांधकामे, पत्रा शेड, हॉटेल, दुकाने आणि अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर एक वर्ष होत आले, तरी सेवा रस्त्याचे डांबरीकरण अद्यापही करण्यात आले नाही. एवढेच नव्हे, तर डांबरीकरणास अडथळा ठरणार्‍या विद्युत वाहिन्या, फिडर बॉक्स, भूमिगत वाहिन्या आणि झाडेही अद्याप काढण्यात आली नाहीत. सेवा रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे अपघात होत आहेत.

आंबेगाव बाजूकडील सेवा रस्ता महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच नर्‍हे बाजूकडील सेवा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अतिक्रमणे काढलेल्या सेवा रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास प्रशासनास मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी संजय कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

काम न झाल्यास आंदोलन

सेवा रस्त्याच्या कामाबाबत महापालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सतत पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्यापही कार्यवाही करण्यात आली नाही. दोन्ही प्रशासनांनी त्वरित या रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा तीव— आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष भूपेंद्र मोरे यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्गालगत आंबेगाव बाजूला सर्व्हे नं.4/5मधून नर्‍हे स्मशानभूमीलगत सेवा रस्त्याचे काम महापालिकेने प्रस्तावित केले आहे. त्यातील नाल्यालगत 180 मीटर लांबीच्या सीमा भिंतीचे काम पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. येथील शेजारील विकासकाकडून तडजोडीने सेवा रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

-अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, रस्ते विभाग, महापालिका

हेही वाचा

SCROLL FOR NEXT