पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे डेप्युटी मॅनेजरची (उपव्यवस्थापक) २३ लाख १४ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी आकाश दिनेश पवार (वय 36) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांना २४ नोव्हेंबर 2024 रोजी इंस्टाग्रामवर शेअर मार्केटशी संबंधित जाहिरात पाहिली. त्यांनी जाहिरातीत दिलेल्या लिंकवर क्लिक करताच त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड झाले. रंजीव मान आणि ऐश्वर्या राजपूत या नावांचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी स्वतःला ग्रुपचे अॅडमिन असल्याचे सांगत शेअर ट्रेडिंग व आयपीओच्या माध्यमातून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोबाईल अॅप डाउनलोड करण्यास सांगितले.
यानंतर विविध बँक खात्यांमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली रक्कम पाठविण्यास सांगण्यात आले. २ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान पवारने २३ लाख १४ हजार १० रुपये विविध बॅक खात्यांमध्ये पाठवले. अॅपमध्ये त्यांच्या गुंतवणुकीवर ८३ लाखांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले. फिर्यादीने पैसे काढायचे असल्याचे सांगितल्यावर नफ्यावर आधी १२ टक्के कर भरावा लागेल असे सायबर चोरट्यांकडून सांगण्यात आले.
हा कर नफ्यातून वजा करा असे सांगितले असता आधी कराची रक्कम भरल्याशिवाय पैसे मिळणार नसल्याचे सायबर चोरट्यांनी सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी फिर्याद दिली.याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक (गुन्हे) जगदाळे करत आहेत.