निमोणे: निमोणे - कारेगाव रस्त्याच्या साईडपट्टीवरून रांजणगाव औद्योगिक वसाहतीसाठी नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असल्याने या रस्त्यावर जागोजागी राडारोडा पडला आहे. त्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे साईडपट्टी उखडलेल्या या रस्त्यावरून प्रवास करणे अतिशय जोखमीचे झाले आहे. या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
शनिवारी (दि.24) विटांची वाहतूक करणारा एक ट्रक रस्त्यावर पलटी झाला. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक खोळंबली होती. तर हा ट्रक पलटी होत असताना दैव बलवत्तर म्हणून दोन दुचाकीस्वार बचावले. (Latest Pune News)
अरुंद रस्त्यामुळे समोरच्या वाहनाचा अंदाज येत नाही. भरधाव ट्रक दुचाकीस्वाराच्या अंगावर येत असताना प्रसंगावधान राखत दुचाकीस्वारांनी रस्त्यालगतच्या शेतात उडी मारली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
शिरूरच्या पूर्व भागातील व श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांच्या कायम वापरातील हा रस्ता आहे. या परिसरातील बहुतांशी कामगार औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत आहेत. मात्र, नवीन जलवाहिनीचे काम सुरू झाल्याने ठेकेदाराने मनमानी कारभार करीत या रस्त्याची वाट लावली. नियमांचे पालन न केल्याने व साईडपट्ट्या खोदल्याने रस्ता अरुंद झाला आहे.
दुचाकी आणि चारचाकींचे सतत अपघात होत असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. चालकाला जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. औद्योगिक वसाहतीची जलावाहिनी व उच्चक्षमतेची विद्युत वाहिनी साईडपट्टीवरूनच जात असल्याने नागरिकांच्या जीविताचा अक्षरशः खेळ झाला आहे.