नानगाव: गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावर मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकर्यांना विद्युत मोटारी सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावर तसेच पुणे शहरात देखील जोरदार पाऊस कोसळत आहे. पुणे शहरातील नदीपात्रातून तसेच जिल्ह्यातील इतर डोंगर भागातून वाहणार्या नद्यांच्या माध्यमातून राहू बेट परिसरातील मुळा- मुठा आणि भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. (Latest Pune News)
तसेच दौंड तालुक्यातील वाळकी (संगमबेट) येथे भीमा आणि मुळा-मठा नद्यांचा संगम होऊन पुढे वाळकी, पारगाव सा. मा. येथून पुढे दोन्ही नद्यांचे पाणी भीमेच्या प्रवाहात वाहते. दोन्ही नद्यांचे पाणी एकत्रित आल्याने पुढे भीमेची पाणीपातळी वाढते. दोन्ही नद्यांमुळे या भागातील शेती बारमाही बागायती आहे.
शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी शेतकर्यांनी नदीकाठावर विद्युत मोटारी बसविल्या आहेत. पावसाळ्यात नदीपात्राला पूर येतात. या काळात शेतकरी विद्युत मोटारी सुरक्षित ठिकाणी काढून ठेवतात. मात्र, यंदा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने लवकरच आणि प्रथमच यंदाच्या वर्षी दोन्ही नद्यांची पाणीपातळी वाढताना दिसत आहे.
विद्युत मोटारी पाण्यात बुडण्याची भीती
उथळ ठिकाणी नदीपात्रातील पाणी लवकरच नदीकाठच्या शेतात जाते. त्यामुळे अशा ठिकाणी नदीकाठी असलेल्या विद्युत मोटारींना पाण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा ठिकाणी असलेल्या मोटारी शेतकरी लवकर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवतात. नाहीतर मोटारी पाण्यात बुडून गेल्यास शेतकर्यांना पुन्हा मोठ्या प्रमाणावर खर्च करून मोटारी व्यवस्थित करून घ्याव्या लागतात. त्यामुळे सध्यातरी अशा ठिकाणचे शेतकरी सावध असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
नदीच्या पाण्यावर पांढरा फेस
गेली दोन दिवसांपासून आकाशात ढगाळ आणि पावसाचे वातावरण असून सूर्याचे दर्शन घडलेले नाही. दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नदीतील पाण्यावर मोठ्या प्रमाणावर पांढरा फेस दिसून येत आहे. त्यामुळे वाढलेल्या पाण्यात रसायनयुक्त पाणी आले की काय, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.