पुणे

Pune Leopard News : आळे येथे दुसरा बिबट्या जेरबंद, मात्र गावात अजूनही बिबट्याची दहशत

अमृता चौगुले

नारायणगाव(ता. जुन्नर) पुढारी वृत्तसेवा : आळे(ता. जुन्नर) गावच्या आगरमळा बाभळबन पिंगळे मळा परिसरात आणखी एक बिबट्या पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्याने गेले 15 दिवस विविध हल्ले केल्याने व त्यात शिवांश हा लहानगा मृत्यू पावल्याने हळहळ व्यक्त केली जात होती. यातच वनविभागाला बिबट्या पकडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांच्या तीव्र भावना उमटत असतानाच या विभागाचे खासदार डाँ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, देवदत्त निकम, आशाताई बुचके, माजी आमदार शरद सोनवणे, सरपंच प्रितम काळे, उपसरपंच विजय कुऱ्हाडे, नेताजी दादा डोके, प्रसन्न डोके, जीवन शिंदे आणि इतर मान्यवरांनी भेट देत कुटूंबाचे सांत्वन करून वन विभागाला निर्देश दिले.

उच्छाद मांडलेले बिबटे जेरबंद करा. यावर तातडीने वनविभागाने उपाययोजना करीत 17 पिंजरे 15 कॅमेरे, तसेच ड्रोन कॅमेरा यांचा वापर करत गस्त घालून त्यातील एक्सपर्ट टीम तैनात केली होती. मात्र दुसरा बिबट्या पकडण्यात यश आले असले, तरी हल्ला केलेला तोच बिबट्या आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय मादी आणि तीचे बछडे जर असे एकेक करून पकडले व विभक्त केले तर बिबट्या मादी नक्की चवताळून पुन्हा हल्ले करणार नाही ना? ही शंका निर्माण होत आहे.

बिबट प्रजननावर नियंत्रण रहावं यासाठी नसबंदी

खासदार कोल्हे आणि आमदार बेनके हे बिबट प्रजननावर नियंत्रण रहावं यासाठी बिबट्याची नसबंदी करावी असा उपाय सुचवत असले तरी वन विभागाचे केंद्राचे कायदे, प्राणिमित्र संघटना, या सर्वच बाबी अडसर ठरणार असल्या तर मग उपाय सुचवून उपयोग तरी काय? अशी भावना सर्वसामान्यांच्या मनात आहे. बिबट्यांची प्रचंड वाढलेली संख्या, दिवसा होत असलेले बिबटच दर्शन यामुळे बिबट सफारी वेगळी कशाला आमच्याच मळ्यात पर्यटक फिरवा आणि दाखवा त्यांना आमच्या शेतामळ्यातील उसातील मस्त कळपाने विहार करणारे बिबटे अशी सामान्य शेतकऱ्यांची तीव्र भावना राज्यकर्ते यांविषयी असल्याचे दिसते.

बिबट मानव संघर्ष अजून किती दिवस

एकुणच बिबट मानव संघर्ष अजून कुठल्या टोकाला जावून पोहचणार आहे? अशी चिंता या बिबट प्रवण क्षेत्रातील जनतेला भेडसावत आहे. पण नक्कीच जनता असुरक्षीत आहे. सरकार मात्र सुस्तावल्यासारखं दुर्लक्ष करतय का? असा सवाल स्थानिक नागरिक व्यक्त करीत असून यावर काही ठोस उपाययोजना शासन वन विभाग करणार आहे का? की असचं जीव मुठीत धरून जगाचा पोशिंदा शेतकरी, शाळकरी मुले, जगणार आहेत का? असचं असुरक्षीत वातावरण राहीलं तर मात्र येत्या निवडणूकीत लोक जाब विचारतील का? हे पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

नरभक्षक बिबट्या कोणता, याची तपासणी होणार?

9 तारखेला बिबट्याच्या हल्यात शिवांश अमोल भुजबळ मृत झालेवर दुसऱ्या दिवशी एक मादी बिबट्या पकडण्यास वन विभागाला यश आले. आज सहा दिवसांनी दुसरा बिबट्या पकडण्यात आला आहे. या दोन पैकी नरभक्षक बिबट्या कोणता? याची तपासणी होणार आहे. तसेच नरभक्षक बिबट्या पकडल्याशिवाय ही मोहीम बंद होणार नाही अशी माहीती उपवन संरक्षक अमित भिसे यांनी दिली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT