ST Bus Mandator school trips Pudhari
पुणे

School Excursions Maharashtra: शाळांच्या सहलींसाठी आता फक्त लालपरी; खासगी बस वापरल्यास कारवाई

सरकारी एसटी बसमधूनच शाळांच्या सहली होणार; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि नियमांचे पालन करण्यासाठी आदेश

पुढारी वृत्तसेवा

गणेश खळदकर

पुणे: शिक्षण विभागाच्या अटी आणि शर्तींचे पालन न करता स्कूलबस किंवा खासगी प्रवासी बसने सहल घेऊन जाणा-या खासगी वाहनांवर कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईचा वस्तुस्थितीदर्शक स्वयंस्पष्ट अहवाल द्यावा, असे स्पष्ट आदेश राज्याचे सहाय्यक परिवहन आयुक्त विजय तिराणकर यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक तसेच उपप्रादेशिक अधिका-यांना दिले आहेत. त्यामुळे यापुढे शाळांच्या सहली आता सरकारी बसने अर्थात लालपरी घेऊनच कराव्या लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सहल म्हणजे खरे तर शालेय जीवनात हसतखेळत नव्या गोष्टींचे ज्ञान मिळवणे, नव्या ठिकाणांना भेटी देणे आणि यामाध्यमातून विद्यार्थ्यांना नविन काहीतरी शिकण्याची संधी मिळवून देणे हा उद्देश असणे गरजेचे आहे. परंतु शाळांच्या सहलींसाठी बहुतांश वेळा वॉटर पार्क, रिसॉट्‌‍र्स, बागबगिचे आदींना प्राधान्य दिले जायचे. यामध्ये बदल करण्यात येऊन शाळांच्या सहली आता ऐतिहासिक स्थळांकडे नेण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळण्याबरोबरच सांस्कृतिक, भौगोलिक, शैक्षणिक गोष्टी अनुभवण्यासाठी ऐतिहासिक स्थळी सहली नेण्यात येणार आहेत.

सरकारी निर्णयात शाळांनी सहलीसाठी सरकारच्या एसटीलाच प्राधान्य द्यावे हा नियम आहे. परंतु खासगी शाळांचा स्वत:च्या स्कूल बस सहलीसाठी वापरण्याचा आग््राह असतो किंवा खासगीबसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु परिवहन विभागाच्या आदेशाने आता स्कूलबस किंवा खासगी वाहनाने सहल काढल्यास कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे शाळांना सहलींसाठी आता लालपरीचा वापर करण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य परिवहन महामंडळासमोर दुहेरी आव्हान

राज्यात विद्यार्थ्यांना एसटी बस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्याव्या लागल्यामुळे सामान्य प्रवाशांना विविध ठिकाणी जाण्यास बस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे खासगी बसवर बंदी घातल्यानंतर आता सर्वच शाळांना एसटी बस उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे एकीकडे शाळांना बस उपलब्ध करून देणे आणि दुसरीकडे प्रवाशांना देखील वेळेवर बस उपलब्ध करणे असे दुहेरी आव्हान राज्य परीवहन मंडळासमोर असणार आहे.

सरकारी एसटीचे फायदे ...

  • सरकारी एसटीने राज्यात हव्या त्याठिकाणी जाण्याची संधी

  • कमी खर्चात सहलीसाठी एसटी उपलब्ध

  • सरकारी एसटीमुळे विद्यार्थ्यांच्या

  • सुरक्षेची हमी

  • शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद

सरकारी एसटीचे तोटे...

  • विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी गाड्या लवकर उपलब्ध होत नाहीत

  • विद्यार्थ्यांना अत्यंत खराब बस उपलब्ध होतात

  • बस जुन्या असल्यामुळे सहलीदरम्यान बंद पडण्याची शक्यता

  • विद्यार्थ्यांना चांगल्या एससी खासगी बसने सहलीला जात येता नाही

  • विद्यार्थ्यांना एसटी बस उपलब्ध केल्यामुळे प्रवाशांना बस उपलब्ध होण्यावर मर्यादा

सहलींसाठी शिक्षणाधिका-यांची परवानगी घेऊन शाळांच्या सहली या सरकारी एसटीनेच घेऊन जाणे गरजेचे आहे. 50 विद्यार्थ्यांमागे पाच शिक्षक घेऊन जाणे गरजेचे आहे. विद्यार्थीनी असतील तर महिला शिक्षक असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर सहलींसाठी शिक्षण विभागाची जी नियमावली आहे त्या नियमावलीचे शाळांनी पालन करणे गरजेचे आहे.
शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT