नवी सांगवी : पिंपळे गुरव येथील विनायकनगर समोर शाळा सुटताना व भरताना खासगी शाळांच्या वाहनांमुळे येथील रस्त्यावरून ये-जा करणार्या चालकांना अडथळा निर्माण होत आहे. तसेच, याचा नाहक त्रास परिसरातील स्थानिक नागरिक, व्यावसायिकांना होत आहे.
शाळा सुरू झाल्यामुळे रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. गेली दोन महिने शाळांना उन्हाळ्याची सुटी असल्यामुळे शांतता होती. रस्त्यावरील वर्दळदेखील कमी होती. सध्या सर्वत्र शाळा सुरू झाल्यामुळे रस्त्यावर पालक व विद्यार्थ्यांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आणखी भर पडत आहे ती म्हणजे शालेय वाहतूक करणार्या वाहनांची. या वाहनांमुळ परिसरातील मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडी तसेच रस्त्यावरून ये-जा करणार्या चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बेशिस्तपणे पार्क केल्याने दुतर्फा रस्ता अरुंद
येथील आजूबाजूच्या परिसरात अनेक शाळा असल्यामुळे विद्यार्थी व पालकांची शाळेच्या वेळेत मुख्य रस्त्यावरून ये- जा सुरू असते. मात्र, येथील परिसरातील अंतर्गत रस्त्यावर असणार्या शाळेमुळे विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी असणारी शालेय वाहने बेशिस्तपणे रस्त्याच्याकडेला पार्क केलेली असतात. त्यामुळे अनेकदा इतर वाहनचालकांना याचा नाहक त्रास होत आहे. शाळेची वाहने बेशिस्तपणे पार्क केल्याने दुतर्फा रस्ता अरुंद होत आहे. पीएमपी बस आणि खासगी बस आल्यास वाहतूक ठप्प होत आहे.
सध्या शाळा सुरू झाल्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होणार नाही, यासाठी सांगवी वाहतूक पोलिसांनी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. वाहतूक विभागाने स्कूल बस, व्हॅनच्या चालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे. शाळेच्या वाहनांमुळे परिसरातील नागरिकांना, मुख्य रस्त्यावरील वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हे ही वाचा :