School Trip Bus Accident Pudhari
पुणे

Ahilyanagar School Bus Accident: Zp शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन सहलीला निघालेली बस पलटी; 13 मुले, पाच शिक्षक जखमी

अहिल्यानगर–कल्याण महामार्गावरील खामुंडी हद्दीत घटना; 13 विद्यार्थी व 5 शिक्षक जखमी, जीवितहानी टळली

पुढारी वृत्तसेवा

ओतूर: नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाले येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या सहलीच्या बसचा गुरुवारी (दि.१२) सकाळी ८ वाजता भीषण अपघात झाला. अहिल्यानगर–कल्याण महामार्गावरील खामुंडी गावाच्या हद्दीत (एमएच १४ एलएक्स ६७४७) या बसचा पुढील टायर अचानक फुटल्याने बस चालकाचा ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी शहाले येथील जिल्हा परिषद शाळेचे सर्व विद्यार्थी शिवनेरी किल्ल्यावर शैक्षणिक सहलीसाठी निघाले होते. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक व काही पालकही उपस्थित होते. सकाळच्या सुमारास बस खामुंडी गावाजवळ पोहोचत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि पुढील टायर फुटला. चालकाने बस सावरण्याचा प्रयत्न केला; मात्र वेग आणि अचानक झालेल्या बिघाडामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली.या अपघातात १३ मुले व पाच शिक्षक जखमी झाल्याचे वृत्त हाती आले असून एकूण किती विद्यार्थी बसमध्ये होते, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी आणि इतर वाहनचालकांनी मदतकार्य सुरू केले. काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती असून, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी लवाजम्यासह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणून जखमींना आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल केल्याचे समजते. दरम्यान येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून बसची तांत्रिक तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असून शालेय सहलींसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी आणि सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे. या घटनेमुळे सहलीच्या आनंदावर विरजण पडले असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT