School Bag Policy Pudhari
पुणे

School Bag Policy 2020: विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन आता १० टक्क्यांपेक्षा अधिक नको; ‘स्कूल बॅग पॉलिसी’ची काटेकोर अंमलबजावणी

अनावश्यक पुस्तके-वह्या आणण्यास मनाई; सहावी ते आठवीसाठी वर्षातून १० दिवस ‘दप्तरविरहित’ उपक्रम, शाळांची अचानक तपासणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दप्तराच्या अतिरिक्त वजनाचा परिणाम होऊ नये तसेच अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी आणि कृतिप्रधान व्हावी, यासाठी विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या साधारणतः १० टक्क्यांपेक्षा अधिक दप्तराचे वजन असू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना शाळांना करण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. राज्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच मान्यताप्राप्त खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांना ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’मधील तरतुदींची माहिती देऊन त्यांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संचालनालयाच्या सूचना

  • विद्यार्थ्यांना दररोज अनावश्यक पुस्तके, वह्या, कार्यपुस्तिका किंवा इतर शैक्षणिक साहित्य आणण्यास सांगू नये.

  • वेळापत्रकानुसार आवश्यक पुस्तके व साहित्य आणण्यासाठी वर्गनिहाय ‘बॅग टाईमटेबल’ तयार करावा.

  • शक्य असल्यास शाळांनी वर्गनिहाय कपाटे, शेल्फ किंवा लॉकरची व्यवस्था करून पुस्तके शाळेतच ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

  • सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षातून १० दिवस ‘दप्तरविरहित कालावधी’ नियोजित करावा.

  • या कालावधीत स्थानिक कारागीर, व्यावसायिक आणि कौशल्याधारित व्यक्तींच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देणारे उपक्रम घ्यावेत.

  • शाळांमध्ये स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी असल्यास विद्यार्थ्यांना पाण्याची बाटली रोज आणण्याची गरज राहणार नाही.

दप्तरविरहित उपक्रम आयोजनाच्या सूचना

राज्यातील शाळांमध्ये सुतारकाम, बागकाम, मातीची भांडी, हस्तकला, कला, कृषीविषयक उपक्रम, स्थानिक व्यवसायांची ओळख यांचा समावेश करता येणार आहे. याशिवाय, कला व हस्तकला, क्रीडा, प्रश्नमंजूषा, वाचन-कथाकथन, स्थानिक कला-संस्कृती, परिसर अभ्यास, क्षेत्रभेट आणि पर्यावरण संवर्धन, यांसारखे दप्तरविरहित उपक्रम वर्षभर आयोजित करण्याच्या सूचना आहेत.

शाळांची अचानक तपासणी

शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी शाळाभेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन तपासावे. पुस्तक-वह्यांची संख्या, ‘बॅग टाइमटेबल’, पिण्याच्या पाण्याची सुविधा, दप्तरविरहित दिवसांची अंमलबजावणी, पालकांना दिलेले मार्गदर्शन आणि दप्तर वजन तपासणी नोंदवहीचीही पडताळणी केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT