Schedule H Drug Misuse Pudhari
पुणे

Schedule H Drug Misuse: डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय शेड्युल-H औषधांची विक्री धडाक्यात!

“पुण्यात ‘पुढारी’ची धडक पाहणी; मेडिकल स्टोअर्सचे नियमभंग उघड—आरोग्याला गंभीर धोका, प्रशासन कुठे?”

पुढारी वृत्तसेवा

वारजे परिसरातील एका मेडिकल स्टोअरमध्ये घडलेला हा प्रातिनिधिक प्रसंग. औषध विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने ‌‘शेड्युल एच‌’ प्रकारातील औषधांची विक्री फक्त डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच करण्याचे कडक नियम तयार केले आहेत. तरीही शहरात ही औषधे चिठ्ठीशिवाय विकली जात असल्याचे वास्तव समोर आले. ‌‘पुढारी‌’ प्रतिनिधीने वारजेसह शिवाजीनगर, कॅम्प, हडपसर आदी परिसरांमधील विविध मेडिकल स्टोअरमध्ये केलेल्या पाहणीत नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट झाले.

‌‘साधं सर्दी-खोकल्याचं आहे का? मग चालतं. अर्रे, एवढं काय विचारता? चिठ्ठी नसेल तरी देतो, घेऊन जा‌’, असे शब्द शिवाजीनगरमधील एका मेडिकल स्टोअरमधील विक्रेत्याने उच्चारले. प्रतिनिधीने डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन नसल्याचे सांगितल्यानंतरही तो सहजपणे शेड्युल एच प्रकारातील औषध देण्यास तयार झाला. काही ठिकाणी विक्रेते औषधे देताना चिठ्ठी मागत होते. पण नंतर ती तपासण्याची तसदी न घेता फक्त ‌‘परिचित असल्याचा‌’ बहाणा पुरेसा ठरत होता

अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांनुसार शेड्युल एच औषधांची विनाचिठ्ठी विक्री केल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई, दंड तसेच परवाना रद्द करण्याची तरतूद आहे. पण प्रत्यक्षात अशा कारवाया अत्यल्प होत असल्याने विक्रेत्यांना भीती उरली नसल्याचे पाहणीतून निदर्शनास आले. ग््रााहक हट्ट करतात, त्यांना रिकाम्या हाताने पाठवणे कठीण जाते, असे काही औषध विक्रेत्यांनी स्वतःची बाजू मांडताना सांगितले आहे.

‘शेड्यूल एच‌’मध्ये कोणती औषधे?

दारूचे सेवन कमी करण्यासाठी वापरले जाणारे औषध, व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी लागणारी अँटीबायोटिक्स, हार्मोनल औषधे, उच्च रक्तदाब आणि मानसिक आरोग्याची औषधे-ही सर्व शेड्युल एच अंतर्गतच येतात. मानसिक आजारावरची औषधे वगळता वरील सर्व प्रकारच्या औषधांची विक्री सर्रासपणे केली जात आहे. विना प्रिस्क्रिप्शन विक्री केवळ कायद्याचे उल्लंघन नाही, तर आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारी आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक मेडिकल स्टोअरमध्ये हे औषध ‌‘सहज उपलब्ध‌’ असल्याचे पाहणीदरम्यान स्पष्ट झाले.

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणतीही औषधे विक्रेत्यांनी देऊ नये, असे आवाहन केमिस्ट असोसिएशनकडून वारंवार केले जाते. अशा विक्रेत्यांवर कारवाई झाली पाहिजे, यावर संघटना ठाम आहे. मात्र, बरेचदा केमिस्टऐवजी डॉक्टरच स्वत:कडील ‌‘शेड्यूल एच‌’ प्रकारातील औषधे रुग्णांना देतात. ‌‘शेड्यूल एच 1‌’ची नोंदवही त्यांच्याकडून नियमित भरली जात नाही. औषध विक्रेत्यांकडे अशी नोंदवही उपलब्ध असते. मग नियम मोडणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होणेही आवश्यक आहे.
अनिल बेलकर, सचिव, जिल्हा केमिस्ट असोसिएशन.
रुग्णांनी स्वतःहून अँटिबायोटिक घेणे, डोस अपुरा ठेवणे किंवा उपचार अर्धवट सोडणे ही सर्वात मोठी चूक आहे. या गैरवापरामुळे औषधांचे परिणाम कमी होत आहेत. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अँटिबायोटिक सातत्याने घेतल्याने जीवाणूंमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होते. त्यामुळे औषधांचा शरीरावर परिणामच होत नाही. अनेकदा रुग्ण अर्धवट डोस घेऊन सोडून देतात किंवा गरज नसताना अँटिबायोटिक घेतात. त्यामुळे परिणामकारकता कमी होते आणि खरेच गरज असेल तेव्हा औषधांचा उपयोग दिसत नाही. डॉक्टर रुग्णांची तपासणी करून आजाराची तीवता, वय आणि वजनानुसार औषधे देतात. प्रत्येक आजारासाठी वापरली जाणारी औषधे वेगवेगळी असतात. त्यामुळे गरज नसताना औषधे घेणे आणि डॉक्टरांनी दिलेला डोस पूर्ण न करणे चुकीचे आहे. याबाबत जनजागृती अत्यंत गरजेची आहे.
डॉ. अनिता बसवराज, प्राध्यापक, औषधशास्त्र विभाग, ससून रुग्णालय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT