पुणे

नवी सांगवी : पाण्याच्या टाकीवर रेखाटली निसर्गचित्रे

अमृता चौगुले

नवी सांगवी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत पाणीपुरवठा विभागाच्या जागेचे सुशोभीकरण करण्यात आले आहे; तसेच चित्रे रेखाटल्यामुळे नागरिकांचे लक्ष आकर्षित करीत आहेत. येथील नैसर्गिक वातावरण झाडेझुडपे तसेच कार्यालय व पाण्याच्या टाकीवर केलेले रंगकाम याची पिंपळे गुरव व शहरात चर्चा सुरू आहे. परिसरातील नागरिक येथील सुशोभीकरण तसेच बहरलेली वेली, फुले पाहण्यासाठी येत आहेत.

महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग हा 2008 साली पाऊण एकरात विकसित करण्यात आला. या वेळी टोलेजंग अशा 15 लक्षची एक चौकोनी टाकी आणि 10 लक्षच्या दोन गोल टाक्या अशा 35 लक्ष लिटर क्षमता असलेल्या तीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात आले आहेत. गेल्या तीन वर्षात स्मार्ट परिसरा सोबत येथील पाणी पुरवठा विभागात सुसज्ज कार्यालयीन व्यवस्था, स्वच्छतागृह, सुरक्षा भिंत, त्यावर रंगीबेरंगी पशु व पक्षांची, निसर्गरम्य वातावरणाची चित्रे रेखाटलेली पहावयास मिळत आहे.

दक्षिणेकडे व पश्चिमेकडे भव्य लोखंडी प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नैसर्गिक वातावरणात चर्चा सत्र करण्यासाठी स्मार्ट बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. येथील पाणी पुरवठा विभागात 2 स्टोअर रूम, जनरेटर व्यवस्था, स्वतंत्र सुसज्ज असे पंपिंग रूम आहे. एकूण 120 एचपी चे 4 पंप आहेत. त्यासाठी कंट्रोल पॅनेल व ट्रान्सफॉर्मर लावण्यात आले आहे.

झाडे, वेली बहरल्या

येथील परिसरात सुरक्षा भिंती लगत लावण्यात आलेली देशी झाडे, शोभेची, आंब्याची, जांभळाचे, फणसाचे, बेलाची झाडे तसेच, वेली, पाने, फुले यांनी सध्या बहरून गेली आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याच्या टाक्या व निसर्गरम्य वातावरणामुळे थंडावा जाणवत आहे.

पाणी पुरवठा विभागात सलोख्याचे व आनंदी वातावरण राहावे यासाठी परिसरातील स्वच्छता करून परिसर सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेतले. ते पूर्ण करण्यात आले. नामांकित कंपन्यांचे इंनलेट, आउटलेट, वॉल्व्ह, एअर वॉल्व्ह बदलण्यात आले. त्यामुळे पाणी गळती रोखण्यास मदत मिळाली. या परिसरात अमृत योजना व इतर प्रभागांतर्गत कामकाजांमधून पाण्याच्या नलिका व कनेक्शन बदलण्यात आले. तसेच जुन्या लाईन बंद केल्याने अनधिकृत कनेक्शन पूर्ण पणे बंद झाले. त्यामुळे पुरेसा आणि क्षमतेने नागरिकांना पाणी मिळत आहे.

– राहुल पाटील, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा

हेही वाचा

SCROLL FOR NEXT