पुणे: पुण्यातील सांस्कृतिक वैभवाचा भाग असलेल्या 71 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा स्वरयज्ञ आज बुधवार (दि.10) पासून रंगणार असून, महोत्सवात दिग्गजांसह नवोदित कलाकारांच्या कलाविष्काराचा नजराणा पाहण्याची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. रसिकांना सवाईच्या स्वरयज्ञात सुरेल स्वरांची, वादनाची अनुभूती मिळणार आहे.
बुधवारी (दि.10) दुपारी तीन वाजता या सांगीतिक स्वरयज्ञाला दिल्लीस्थित लोकेश आनंद यांच्या मंगलमय सनईवादनाने सुरुवात होईल. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजिलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडा संकुल येथे 10 ते 14 डिसेंबरदरम्यान महोत्सव रंगणार असून, कार्यक्रमस्थळी सुमारे 8 ते 10 हजार रसिकांना सामावून घेणाऱ्या मंडपाची उभारणी करण्यात आली आहे.
महोत्सवाची सुरुवात बुधवारी (दि. 10) दुपारी तीन वाजता लोकेश आनंद यांच्या सनईवादनाने होईल. त्यानंतर किराणा घराण्याच्या गायिका डॉ. चेतना पाठक या आपली गायनसेवा सादर करतील. बनारस घराण्याचे गायक आणि पं. राजन मिश्रा यांचे पुत्र-शिष्य असलेल्या रितेश आणि रजनीश मिश्रा या मिश्रा बंधूंचे सहगायन रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
पं. शुभेंद्र राव आणि त्यांच्या पत्नी सास्किया राव-दे-हास यांचे सतार आणि चेलो असे सहवादन होणार असून, पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल. या स्वरयज्ञात रसिकांना वैविध्यपूर्ण संगीत श्रवणाची पर्वणी मिळणार आहे.
रसिकांसाठी विशेष बससेवा
महोत्सवासाठी येणाऱ्या रसिकांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी महोत्सवाच्या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था, मोठ्या एलईडी स्क्रीन्स, अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आदी सुविधा महोत्सवाच्या ठिकाणी असणार आहेत. पीएमपीएमएलतर्फे कार्यक्रम संपल्यानंतर विशेष बससेवा रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली.