पुणे

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात : सुरेल गायकी अन् नृत्याविष्कार

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : युवा गायिका प्राजक्ता मराठे यांच्या शानदार गायकीचा स्वरानंद अन् देबप्रिय अधिकारी व समन्वय सरकार यांच्या गायन – सतारच्या सहसादरीकरणाने दिलेली स्वरानुभूती अशा सुरेल वातावरणात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची जबरदस्त सुरुवात झाली अन् गायन, वादनाच्या आतषबाजीने रसिकांची मने जिंकली. यामिनी रेड्डी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कुचीपुडी नृत्याविष्काराने दाद मिळवली आणि अभय सोपोरी यांच्या संतूर वादनाने रसिकांच्या मनाच्या तारा छेडल्या. सुटीचा दिवस असल्याने शनिवारी रसिकांची मोठी गर्दी झाली होती. शेवटी झालेल्या ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांच्या जादुई सुरांनी रसिकांची दिलखुलास दाद मिळवली.

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित या महोत्सवाच्या चौथ्या दिवशीही रसिकांनी गायन, वादन अन् नृत्याचा सुंदर मिलाप अनुभवला. ज्येष्ठ गायक – संगीतकार पं. राम मराठे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या कलेचा वारसा पुढे नेणार्‍या गायिका प्राजक्ता मराठे यांनी सवाईच्या स्वरमंचावर पहिल्यांदा सादरीकरण केले. प्राजक्ता यांनी पूर्वा रागात 'मालनहो' हा ख्याल मांडला. त्याला जोडून पं. राम मराठे यांची 'नारी चंचल चतुर सुघर' ही बंदिश त्यांनी सादर केली. पं. राम मराठे यांनी संगीतबद्ध केलेल्या संगीत मंदारमाला नाटकातील 'हरी मेरो जीवनप्राण आधार' ही मिश्र पिलूमधील भक्तिरचना सादर केली. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी 'सोहं हर डमरू बाजे' हे राग तोडीमधील नाट्यपद सादर करून गायनाची सांगता केली.

त्यानंतर देबप्रिय अधिकारी आणि समन्वय सरकार यांच्या गायन आणि सतार सहवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कलाकारांनी 'हेमंत' रागात आलाप, जोड, झाला अशा वादन पद्धतीने सादरीकरणाची सुरुवात केली. कंठसंगीतातून आणि सतार वादनातून एका पाठोपाठ एक आवर्तनातून हेमंत रागाचे रूप त्यांनी उलगडत नेले. ध्रुपद शैलीतील नोमतोम करत एक वेगळाच श्रवणीय अनुभव या दोन्ही कलाकारांनी रसिकांना दिली. टप्पा अंगाने जाणारी द्रुत रचना सादर करून त्यांनी सांगता केली.

त्यानंतर झालेल्या नृत्य कलाकार यामिनी रेड्डी यांच्या कुचीपुडी नृत्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. सुरुवातीला 'वक्रतुंड महाकाय' या गणेशस्तुतीने वादकांनी सुरुवात केल्यावर यामिनी यांचे व्यासपीठावर आगमन झाले. त्यांनी सरस्वती वंदना सादर केली. त्यानंतर यामिनी यांनी शिवदेवतेचे 'नवरसदर्शन' घडवणारी रचना समर्थ अभिनयाचा प्रत्यय देत सादर केली. शृंगार, वीर, करुण, हास्य, वीर, भय, रौद्र, बीभत्स.. असे रसभावदर्शन त्यांनी प्रेक्षकांना घडवले. शिवाचे तांडव करणारे रूप या नवरसांतून त्यांनी देहबोलीतून, पदन्यासातून यामिनी यांनी प्रदर्शित केले. यामिनी यांनी नंतर पं. भीमसेन जोशी यांच्या प्रसिद्ध 'भज मन रामचरण सुखदायी ' या भक्तिरचनेवर नृत्याविष्कार पेश केला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महोत्सवाला भेट दिली.

अभय सोपोरी यांच्या संतूर वादनातून रसिकांना अपरिचित रागांच्या सौंदर्याची अनुभूती मिळाली. तब्बल नऊ पिढ्यांची कलापरंपरा वारसारूपाने लाभलेल्या अभय यांनी सुरुवातीला राग नंदकौंस या अनवट रागात आलाप आणि जोड, असे सादरीकरण केले. काही स्वराकृती त्यांनी आधी गाऊन दाखवल्या आणि त्यापाठोपाठ संतूरवर त्या स्वरावली वाजवल्याने रसिकांनी एक वेगळा अनुभव मिळाला. अभय यांनी त्यांचे वडील पं. भजन सोपोरी यांच्या सन्मानार्थ 'भजनेश्वरी' राग निर्माण केला आहे. या रागातील वादनासाठी त्यांनी तबल्याची साथ स्वीकारली होती. झपतालातील रचना ऐकवून त्यांनी नंतर एकतालातील 'तोरे बिन मैं कुछ भी नही' ही बंदिश पेश केली. काश्मिरी संत कवयित्री लल्लेश्वरी यांची शैव पंथ परंपरेतील रचना सादर करून त्यांनी विराम घेतला.

'सवाई'च्या चौथ्या दिवसाची सांगता ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने झाली. गायन सुरू होण्यापूर्वी त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. वत्सलाबाई जोशी पुरस्कार बेगम परवीन सुलताना यांना प्रदान करण्यात आला. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, पं. उपेंद्र भट, डॉ. प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे आदी उपस्थित होते. त्यांनी रागेश्री रागात 'सगुन विचार' हा विलंबित ख्याल मांडला. यानंतर त्यांनी मिश्र भैरवीमध्ये 'भवानी दयानी' ही रचना प्रस्तुत केली.

महोत्सवात आज

  • श्रीनिवास जोशी (गायन)
  • पौर्णिमा धुमाळे (गायन)
  • पं. सुहास व्यास (गायन)
  • ऐश्वर्या वेंकटरामन आणि सहकारी (कर्नाटक शास्त्रीय संगीत)
  • कौशिकी चक्रवर्ती (गायन)
  • पं. रोणू मजुमदार (बासरीवादन)
  • डॉ. प्रभा अत्रे (गायन)

पंडित भीमसेन जोशी हे माझ्या मोठ्या भावासारखे होते. आज वत्सलाबाई जोशी या माझ्या वहिनीच्या नावाने मला पुरस्कार मिळतोय ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. या पुरस्काराने मला आणखी चांगली कामगिरी करायची ऊर्जा मिळाली आहे आणि जबाबदारीदेखील वाढली आहे.

बेगम परवीन सुलताना, ज्येष्ठ गायिका.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT